Drowning Incident In Wardha Five Friends Died: उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नदीत गेलेल्या मित्रांसोबत काळाने घात केला आहे. चंद्रपूर या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नेमकी कशी घडली ही घटना?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घुग्गुस शहरातील इंदिरानगर परिसरात राहणारे नकुल केळझकर, तन्मय पथाडे, सम्यक सोनटक्के, सन्नी आसपेल्ली आणि रोहित बोबडे हे पाच मित्र सोमवारी दुपारी घरातून बाहेर पडले. घुग्गुस-वणी मार्गावरील हिंदू स्मशानभूमीजवळ असलेल्या वर्धा नदीच्या चांदूर घाटावर ते पोहण्यासाठी गेले होते.
तिघांचे मृतदेह बाहेर काढले
नदीकाठी कपडे ठेवून सर्वजण पाण्यात उतरले. मात्र नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जण पाण्यात अडकले. त्यानंतर ते बाहेर न आल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संध्याकाळपर्यंत मुलं घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी घुग्गुस पोलिस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान नदीकाठी तरुणांचे कपडे आणि मोबाईल फोन आढळून आल्याने ते नदीत बुडाल्याची शक्यता अधिक बळावली.
यानंतर चंद्रपूर येथून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बोटीच्या मदतीने रात्रभर शोधकार्य सुरू ठेवण्यात आले. शोधमोहीमेदरम्यान तन्मय पथाडे, रोहित बोबडे आणि सन्नी आसपेल्ली या तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.
दोघांचा शोध अजूनही सुरु
दरम्यान, उर्वरित दोन तरुणांचाही शोध सुरू ठेवण्यात आला असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या घटनेमुळे घुग्गुस शहरात शोककळा पसरली आहे. मृत युवकांचे वय अवघे 15 ते 20 वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. एकाच परिसरातील पाच मित्रांवर काळाने घाला घातल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण घुग्गुस शहर शोकमग्न झाले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा