Nagpur Kanhan River Three Drown: एकामागून एक तिघे बुडाल्याने नातेवाइकांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत तिघांचाही बुडून मृत्यू झाला.
चैतन्य बबलू अंबादे (वय ६), गौतम राजकुमार अंबादे (वय ३१ , दोन्ही रा. इंदिरानगर, जरीपटका) व रोहित महादेव नागदेव (वय ३५ , रा. कुंभारे कॉलनी, कामठी) अशी मृतांची नावे आहेत. चैतन्य हा केजी-वनमध्ये शिकत होता. तर रोहित हा ई-रिक्षाचालक होता.
Devendra Fadnavis : ‘गुलाबी आँखे जो तेरी देखी…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायले गाणे, पाहा खास व्हिडीओ
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अंबादे व नागदेव कुटुंब नातेवाईक असून, हे कुटुंबीय पिकनिकसाठी महादेव घाट येथे गेले. महिला जेवणाची तयारी करीत होती. याचदरम्यान चैतन्य हा नदीतील डोहाजवळ खेळत होता. खेळता खेळता त्याचा पाय घसरला. तो डोहात पडून बुडायला लागला. गौतमला तो बुडताना दिसला. चैतन्यला वाचविण्यासाठी गौतमनेही डोहात उडी घेतली. तोही बुडायला लागला. दोघे बुडत असल्याचे रोहितला दिसले. दोघांना वाचविण्यासाठी त्यानेही डोहात उडी घेतली. यात तोही बुडाला. या तिघांना वाचविण्यासाठी गौतमचे वडील राजकुमार यांनीही उडी घेतली. तेही डोहात बुडायला लागले. हातपाय हलवत ते कसेबसे बाहेर निघाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी एकामागून एक तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी तिघांचेही मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरू केला आहे. या घटनेने अंबादे व नागदेव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Nagpur Tari Poha | प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहरांचा विश्वविक्रम, तर्री पोह्याला दिली नवी ओळख
डोह जीवघेणा
महादेव घाटमधील कन्हान नदीतील डोह हा जीवघेणा आहे. यापूर्वीही डोहात बुडून अनेकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाने जीवितहानी टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात,अशी मागणी होत आहे.
क्षणात विरला आनंद
रविवार असल्याने नागदेव व अंबादे कुटुंब पिकनिकसाठी महादेव घाट येथे गेले. त्यांनी सोबत जेवणही नेले. सर्वजण आनंदात होते. जेवणाची तयारी सुरू असतानाच अचानक चैतन्य डोहात बुडाला. त्याच्यामागोमाग अन्य दोघेही बुडाल्याने आनंद क्षणात विरला. घटनेनंतर नातेवाईक धाय मोकलून रडायला लागले. सर्वजण एकमेकांना आधार देत तेथून निघाले. जेवणाचे साहित्य तेथेच पडून होते. या हृदयद्रावक घटननेने कामठी व जरीपटक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
