Rajya Sabha Election NCP Candidate : राज्यसभेच्या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आग्रही होते. तसेच, आपल्याला खासदारकी मिळाल्यानंतर पुतणे समीर यांना मंत्रिपद मिळावे, अशी अटही त्यांनी घातली होती.
अनेक नावांबाबत बैठकीत चर्चा
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची निवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी अर्ज भरण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस आहे. या जागेसाठी पक्षातील अनेक जण इच्छुक होते. भुजबळ यांच्यासोबत अविनाश आदिक, प्रमोद हिंदूराव, अमरसिंह पंडित यांचा यामध्ये समावेश होता. भाजपच्या नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानेही अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते.
या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीआधीच तटकरे यांनी राणा यांच्या उमेदवारीचा विषय निकाली निघाला आहे, असे स्पष्ट केले होते. बैठकीत भुजबळ, हिंदूराव, अमरसिंह पंडित यांच्याबरोबरच प्रतिभा शिंदे यांच्या नावाचीही चर्चा झाली. परंतु, गेल्या काही काळापासून विदर्भातून पक्षाचे प्रतिनिधित्व योग्य प्रकारे होत नसल्याचे अधोरेखित करण्यात आले.
भुजबळांची अट पक्षश्रेष्ठींनी नाकारली
चर्चेदरम्यान भुजबळ यांनी आपली अट घातल्यानंतर त्याला पक्षश्रेष्ठींनी नकार दिल्याचे कळते. त्यामुळे इतर नावांवर चर्चा होत गेली. अखेर अडीच तासांनंतर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘विविध नावांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. दीर्घकाळ राष्ट्रवादीचे निष्ठावान असलेल्या जैन यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
Pune Crime : पुण्याच्या वेशीवर हाऊस पार्टीचे कल्चर, पोलिसांपासून वाचण्यासाठी कमालीची गुप्तता, फक्त 5 तास आधी लोकेशन जाहीर
पटेल यांचे विश्वासू शिलेदार
राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकवर्तीय आणि विश्वासू शिलेदार माजी आमदार राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही उमेदवारी म्हणजे आजवरच्या त्यांच्या पक्षनिष्ठेचे फळ असल्याचे मानले जात आहे. तर खासदार पटेल यांनी पक्षातील आपले वजन वापरत जैन यांच्यासाठी उमेदवारी मिळविल्याचीही चर्चा आहे.
Dhananjay Munde यांचं कमबॅक? Chhagan Bhujbal राज्यसभेत? Sunetra Pawar करणार ३ बदल
दोन टर्म विधान परिषद आमदार
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील राजकीय व सहकार क्षेत्रातील नेते म्हणून राजेंद्र जैन यांची ओळख आहे. विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून २००४ ते २०१६ अशा दोन टर्ममध्ये जैन हे आमदार म्हणून निवडून आले. भाजप नेते डॉ. परिणय फुके यांच्याकडून २०१६च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा घटक पक्ष असल्याने उमेदवारीची आशा मावळली. या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडणूक लढवित आहे. यानंतरही जैन यांनी आपली पक्षावरील निष्ठा कायम ठेवली.
पक्ष संघटनेत योगदान
राजकीय क्षेत्रात कार्य करीत असतानाच गोंदिया शिक्षण संस्थेचा कारभारही ते सांभाळतात. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेपासून आजतागत जैन हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव म्हणून त्यांनी काम केले. राष्ट्रीय पातळीवरही पक्ष संघटनवाढीसाठी त्यांनी कार्य केले. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्यानंतरचे स्थान असलेले नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. नागपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभारीपदही त्यांना देण्यात आले होते.
Delhi Fire : बाथरुममध्ये टॉवेल अंथरले, शॉवर सुरु करुन निपचित पडले… रीलमुळे दिल्लीतील आगीतून जोडप्याचे प्राण वाचले
दरम्यान, जैन यांच्या नावाची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षाचा पुन्हा एक लोकप्रतिनिधी या जिल्ह्याला मिळाल्याने कामे आता अधिक वेगाने होतील असा सूर राष्ट्रवादीत उमटू लागला आहे.
