• Mon. Sep 7th, 2026

एसटी स्थानके व बसेसची दर चार तासांनी स्वच्छता – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 5, 2026
एसटी स्थानके व बसेसची दर चार तासांनी स्वच्छता – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

मुंबई, दि. ५: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज मुंबईतील परळ बसस्थानक येथे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातील बसस्थानके, एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर व प्रवासी-अनुकूल बनविण्याचा महामंडळाचा संकल्प असल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

परळ बसस्थानकातील या कार्यक्रमात स्वच्छता मोहिमेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानके आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्याने नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच एसटी बसेस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे यांची दर चार तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले, एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी एसटीच्या सेवांचा लाभ घेतात. त्यामुळे त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेली ही राज्यव्यापी स्वच्छता मोहीम प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, आनंददायी आणि समाधानकारक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्लास्टिक पिशव्या व बाटल्यांचे पुनर्वापरासाठी संकलन –

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छता मोहिमेदरम्यान आढळणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या व पिशव्या संकलित करून त्यांचे पुनर्वापर (रिसायकलिंग) करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून विविध टिकाऊ व उपयुक्त उत्पादने तयार करण्यात येतील, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, स्वच्छता ही एकदिवसीय मोहीम नसून सातत्याने राबविण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे या मोहिमेच्या अंमलबजावणीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत नियमित देखरेख ठेवली जाणार असून स्वच्छतेच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक बसस्थानकावरील स्वच्छता व्यवस्थेचे नियोजनबद्ध निरीक्षण करण्यात येईल तसेच प्रवाशांकडून मिळणाऱ्या सूचना आणि अभिप्रायांनाही प्राधान्य दिले जाईल.

विस्तारित चार्जिंग केंद्राचे भूमिपूजन –

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळाने आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजन मंत्री सरनाईक यांच्या हस्ते झाले.

यावेळी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय नियंत्रक, कर्मचारी प्रतिनिधी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सरनाईक यांनी परळ बसस्थानक परिसर, प्रवासी प्रतीक्षागृह, प्रसाधनगृहे आणि इतर सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.

००००
संजय ओरके/विसंअ

Pune News : ‘डीजे’विरोधात ध्वनिवर्धन! पुण्यातील मोर्चात बंदीची मागणी, राजकीय नेत्यांचाही समर्थनाचा सूर, पण मोर्चाला विद्यानंद बापट अनुपस्थित; कारण काय?
Yavatmal News: यवतमाळमध्ये भूदानची 33 हजार एकर जमीन बेपत्ता; गैरव्यवहाराची चौकशी सुरु, मोहा गावातील 50 जणांना नोटीस
Baramati Accident : बारामतीहून दहीहंडीसाठी पुण्यात निघाले, नियंत्रण सुटल्याने बाईक घसरली, खाली पडताच भरधाव वाहनाने उडवलं; तरुणाचा जागीच अंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed