• Sat. Jun 6th, 2026

    अन्न व औषध प्रशासनाच्या राज्यव्यापी मोहीमेत ७ दिवसात १०२ व्यक्ती अटकेत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 4, 2026
    अन्न व औषध प्रशासनाच्या राज्यव्यापी मोहीमेत ७ दिवसात १०२ व्यक्ती अटकेत – महासंवाद

    मुंबई, दि. ४: राज्यातील प्रतिबंधित पान मसाला,गुटखा, भेसळ अन्नपदार्थाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर 7 दिवस धडक मोहीम राबवत २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत कारवाईत एकूण १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून १०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण २०३ आस्थापनांवर कारवाई केली. तसेच, ८६ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.

    प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याविरोधात कारवाई

    अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत १३० आस्थापनांवर छापे टाकण्यात आले असून १०२ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच, ८६ आस्थापना सील करण्यात आल्या.

    • कोकण विभाग – ४७ कारवाया, ४६ आरोपी अटक
    • बृहन्मुंबई – २२ कारवाया, २३ आरोपी अटक
    • पुणे विभाग – १४ कारवाया, १३ आरोपी अटक
    • नाशिक विभाग – ५ कारवाया, ५ आरोपी अटक
    • छत्रपती संभाजीनगर विभाग – ८ कारवाया, ८ आरोपी अटक
    • अमरावती विभाग – ५ कारवाया, ५ आरोपी अटक
    • नागपूर विभाग – २ कारवाया, २ आरोपी अटक

    यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या कलम २६, २७, ३०(२)(अ) आणि ५९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत ३४ लाख ५ हजार ४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    भेसळयुक्त व निकृष्ट अन्नपदार्थांवरही कारवाई

    अन्न व औषध प्रशासनाच्या “Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra” या संकल्पनेअंतर्गत राज्यभर भेसळ, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.

    मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, भंडारा, जालना, बीड, नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, जळगाव, रायगड, धुळे आदी जिल्ह्यांमध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तपासण्या केल्या.

    या मोहिमेत ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाले, शेंगदाणा चिक्की तसेच भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा समावेश होता.

    या कारवाईत १ कोटी २४ लाख २३ हजार ६२९ रुपये किमतीचा आणि सुमारे ९०,६३९ किलो वजनाचा संशयित निकृष्ट व असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला. संबंधित अन्न नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed