• Sat. Jun 6th, 2026
    Adhik Maas : भाविकांच्या देणगीतून साकारले 750 किलोचे सिंहासन, अधिकमासात टेकडी गणपतीला भव्य सुवर्णसाज

    गणेश भक्तांच्या ताकदीचा अनुभव देणारी एक घटना आज नागपुरात घडली आहे. नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरात अधिकमासातील संकष्टी चतुर्थीनिमित्त ७५० किलो चांदीच्या सिंहासनावर अर्धा किलो सोन्याचा साज चढवण्यात आला आहे. या भव्य सिंहासनाने मंदिराचे सौंदर्य खुलून गेले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर: अधिकमासातील संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात भक्तांसाठी एक अनोखे आकर्षण साकारण्यात आले आहे. विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि शेजारील राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपूरच्या टेकडी गणपतीला यंदा सुवर्णसाज चढविण्यात आला असून, ७५० किलो वजनाच्या भव्य चांदीच्या सिंहासनावर अर्धा किलो सोन्याचा साज देण्यात आला आहे. या सुवर्ण वैभवामुळे गणरायाचे रूप अधिक तेजस्वी आणि आकर्षक झाले आहे .

    सिंहासन कसे साकारले?

    विशेष म्हणजे हे भव्य सिंहासन कोणत्याही एका उद्योगपती किंवा मोठ्या देणगीदाराच्या मदतीने उभारण्यात आलेले नाही. असंख्य गणेशभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणग्यांमधून हे सिंहासन साकार झाले आहे. त्यामुळे हे सिंहासन केवळ एक कलाकृती नसून हजारो भक्तांच्या सामूहिक श्रद्धा, भक्तीभाव आणि समर्पणाचे प्रतीक ठरले आहे. मंदिर प्रशासनाच्या या उपक्रमाचे भाविकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

    tekdi ganpati nagpur, adhik mass

    विश्वस्त म्हणाले…

    गणेश टेकडी मंदिराचे विश्वस्त दिलीप शहाकार यांनी सांगितले की, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. गर्भगृहाच्या सुशोभीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून सिंहासन आणि गर्भगृहावर सोन्याचा साज चढविण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकमासात गणरायाला सुवर्णाचा वाण अर्पण करण्याच्या धार्मिक परंपरेला अनुसरून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

    “मंदिराच्या सौंदर्यात भर”

    सुमारे सहा फूट उंच आणि दहा फूट घेर असलेले हे भव्य सिंहासन मंदिराच्या गाभाऱ्याचे मुख्य आकर्षण ठरत आहे. खामगाव येथील विश्वकर्मा सिल्वर हाऊसने या सिंहासनाची निर्मिती केली आहे. अत्यंत बारकाईने आणि कलात्मक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या सिंहासनामुळे मंदिराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे.

    tekdi ganpati nagpur, adhik mass 3

    “बाप्पा सुवर्णमय सिंहासनावर”

    ते पुढे म्हणाले की, आमची आणि सर्व भक्तांची इच्छा होती की गणपती बाप्पा सुवर्णमय सिंहासनावर विराजमान व्हावा. कालपर्यंत या कामाची अंतिम तयारी सुरू होती. सिंहासन पूर्ण झाल्यानंतर ते गणरायाला अर्पण करण्यात आले असून आता ते भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे, असे शहाकार यांनी सांगितले.

    भाविकांची मोठी गर्दी

    सुवर्णमयी सिंहासनावर गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. अधिकमास आणि संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर भक्तांसाठी खुले करण्यात आलेले हे सुवर्ण सिंहासन आगामी काळातही भाविकांचे प्रमुख आकर्षण राहणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा