Thane-Bhiwandi-Kalyan Metro: ठाणे-भिवंडी-कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो ५ मुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पण प्रस्तावित मार्गाचा आराखडा तयार करणं अधिकाऱ्यांसाठी एक मोठं आव्हान आहे त्यामुळे कल्याणमधील अनेक कामं रखडली आहेत.
तीन महिन्यांनंतरही आराखडा प्रसिद्ध नाही
राज्यातील मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५च्या माध्यमातून कल्याणमध्ये करण्यात आले. त्यानंतर मुंबईतील अनेक मेट्रोचे उद्घाटन झाले असले तरी ठाणे-कल्याण मेट्रोचे येथील काम सुरू देखील झालेले नाही. या मेट्रोचा कल्याण शहराला फायदा व्हावा, यासाठी हा मेट्रोमार्ग खडकपाडा-बिर्ला कॉलेज-पौर्णिमा मार्गे रेल्वे स्टेशन असा बदलण्याची मागणी ‘एमसीएचआय’ कडून सुरू होती. अखेर या मार्गाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत त्याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. यामुळे कल्याणातून जाणाऱ्या या मेट्रोचा लाभ शहराच्या बहुतांश भागाला होणार आहे. हा अध्यादेश काढून तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापी एमएमआरडीएकडून या मार्गाचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
Bullet Train: पाच महिन्यांत तिसरा पर्वतीय बोगदा पूर्ण, महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या कामाला गती; 2 तासांत होणार अंतर पार
हा मेट्रोमार्ग पौर्णिमा चौकात काटकोनात वळवावा लागणार आहे. तिथेच मेट्रो ५ अ हा मार्ग सुरू होणार आहे. यामुळे या चौकाचे नियोजन करत मेट्रो रेल्वे स्थानकाच्या दिशेने वळविण्याचे सध्या तरी आव्हान वाटत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे या चौकाच्या पुढच्या बाजूने कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मेट्रोमार्ग निश्चित केल्यानंतर या पुलाचे काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा पूल २०२७पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून या पुलाच्या मार्गातील अडथळे दूर करताना प्रशासन आधीच त्रासलेले असताना पुलाचे मुरबाड रस्त्याला जोडणारे सुरुवातीचेच काम तीन महिन्यांपासून थांबले आहे.
मुरबाड रस्ता हा सर्वाधिक वाहतुकीचा रस्ता असून या रस्त्यावर पुलासाठी उभारले जाणारे खांब अर्धवट अवस्थेत आहेत. या खांबांचे काम पूर्ण होईपर्यंत येथील रस्ता वाहतुकीसाठी सुरू करता येणार नाही. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. जोपर्यंत मेट्रोचा आराखडा निश्चित केला जात नाही तोपर्यंत पुलाचे काम करता येणार नसल्याने प्रशासनाकडून एमएमआरडीएकडे आराखड्यासाठी वारंवार विचारणा सुरू आहे.
Dahisar-Mira-Bhayander Metro: पुलावरून थेट पोहचा स्थानकापर्यंत, ‘मुंबई मेट्रो ९’च्या मार्गावर सात पादचारी पूल; कुठे-कुठे बांधणार?
महापालिकेचे ‘एमएमआरडीए’ला पत्र
मेट्रो १२ ही तळोजा-कल्याण मेट्रो कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणली जाणार आहे. मेट्रो ५ याच ठिकाणी मेट्रो १२ बरोबर जोडली जाणार आहे. परिणामी सुभाष चौकातून ही मेट्रो वळविण्यासाठी जास्त जागा लागणार आहे. कल्याण न्यायालयाच्या नव्या इमारतीचे कामही थांबविण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. मेट्रोबरोबरच महापालिकेचे ‘एमएमआरडीए’ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. पण आराखडा येईपर्यंत ती पूर्ण करणे अवघड झाले आहे. यामुळेच ‘एमएमआरडीए’ने मेट्रो ५च्या नव्या मार्गिकेचा आराखडा तयार करून इतर प्रकल्पांचा मार्ग मोकळा करावा, असे पत्र महापालिका प्रशासनाने ‘एमएमआरडीए’ला पाठवले आहे.
नगररचना विभागाची मागणी
महापालिकेच्या विभागाने उड्डाणपुलाचे काम नगररचना थांबवावे लागले असून मेट्रो ५च्या नव्या आराखड्यासाठी एमएमआरडीएकडे वारंवार मागणी सुरू असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून आराखडा प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुलाच्या कामाचे नियोजन करणे सोयीचे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
