• Sat. Jun 13th, 2026
    पाच महिन्यांत तिसरा पर्वतीय बोगदा पूर्ण, महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या कामाला गती; 2 तासांत होणार अंतर पार

    Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या 508 किमी लांब हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोरच्या कामांना आता गती मिळाली आहे. बोईसर स्थाकाजवळील बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. वृत्तसेवा, पालघर: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत राज्यातील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे ब्रेकथ्रू पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अंबेसरी गावाजवळ यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. ४१७ मीटर लांब आणि १४.४ मीटर रुंद असलेल्या या बोगद्याची रचना बुलेट ट्रेन मार्गिकेवरील अप आणि डाऊन या दोन्ही ट्रॅकसाठी करण्यात आली आहे.

    ब्लास्टिंग पद्धतीने उत्खनन

    बोगद्याचे उत्खनन दोन्ही टोकांवरून नियंत्रित ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग पद्धतीने करण्यात आले. उत्खननादरम्यान संरचनेची स्थिरता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक मॉनिटरिंग प्रणाली तसेच भू-तांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात आला. कामादरम्यान कंपन, बोगद्याचे वर्तन आणि परिसरातील संरचनांवर होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण करण्यासाठी सरफेस सेटलमेंट पॉइंट्स (एसएसपी), थ्री-डी टार्गेट्स, स्ट्रेन गेजेस आणि सिस्मोग्राफ्स यांसारख्या रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या होत्या.

    बोगद्यातील कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य वायुवीजन व्यवस्था, अग्निसुरक्षा उपाययोजना, नियंत्रित प्रवेश व्यवस्था आणि सातत्यपूर्ण भू-तांत्रिक निरीक्षणावर विशेष भर देण्यात आला. प्रकल्पातील एकूण आठ पर्वतीय बोगद्यांपैकी सात बोगदे पालघर जिल्ह्यात तर एक बोगदा गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात आहे. या पर्वतीय बोगद्याचे उत्खनन पूर्ण झाल्यामुळे गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रातील तीन पर्वतीय बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील सर्वाधिक गुंतागुंतीच्या विभागांपैकी एका विभागात झालेली ही महत्त्वाची प्रगती मानली जात आहे.

    बोईसर ते वापी मार्गावर बोगदा

    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिका महाराष्ट्रातील बोईसर आणि गुजरातमधील वापी या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातून जाते. वापी आणि बोईसर स्थानकांदरम्यान असलेल्या एमटी-०८, एमटी-०७ आणि एमटी-०६ या तिन्ही पर्वतीय बोगद्यांचे उत्खनन पूर्ण झाले असून या विभागातील इतर बांधकाम कामांनाही वेग आला आहे.

    Maharashtra TimesBullet Train: 12 स्थानकं, डोंगरांमधून 7 बोगदे, देशात पहिल्यांदाच समुद्राखाली रेल्वे मार्ग; मुंबईत कधी धावणार ‘बुलेट ट्रेन’?

    केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी आपल्या Xवरील पोस्टद्वारे याबद्दल माहिती दिली. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये बुलेट ट्रेनचं खोदकाम सुरू आहे. व्हायडक्ट्सची संख्या वाढत असून मुंबईजवळ समुद्राखाली बोगद्याचंही काम सध्या सुरू झालं आहे. स्थानकांचं अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे. भारतातील पहिली स्वदेशी विकसित हाय-स्पीड बुलेट ट्रेन 2027पर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

    दरम्यान, नुकतेच अहमदाबादमध्ये पश्चिम रेल्वेच्या साबरमती-मुंबई मुख्य मार्गावरील कालूपूर उड्डाणपुलावरील व्हायडक्टचं काम पूर्ण झालं आहे. एक रेल्वे मार्गिकेला समांतर धावणाऱ्या रेल्वे व्हायडक्टच्या उभारणीचं काम सोमवारी पूर्ण झालं होतं.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा