• Fri. Jun 5th, 2026
    Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी वाहतूक नियोजन; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा आदेश

    अमुलकुमार जैन, रायगड : महाराष्ट्रासाठी 6 जून हा अत्यंत गौरवाचा दिवस मानला जातो. कारण या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगड येथे राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे शिवप्रेमींसाठी हा खूप मोठा दिवस आहे. दरवर्षी किल्ले रायगड येथे राज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतं. राज्यासह देशभरातील लाखो शिवप्रेमी यावेळी रायगडवर दाखल होतात. दरवर्षी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कृतीतून शिवराज्याभिषेक दिवस सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा नेमका कसा साजरा केला जाईल, याबाबत काल कोल्हापुरात राज्यभिषेक सोहळा समितीने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. यानंतर आता वाहतुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

    किल्ले रायगड येथे ५ आणि ६ जून २०२६ रोजी होणाऱ्या भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घातली आहे. लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या आदेशानुसार ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते ६ जून २०२६ रोजी रात्री १० वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकण फाटा–नागोठणे ते कशेडी घाट या मार्गावर तसेच माणगाव–निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव–ढालघर फाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला आणि महाड–नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गांवर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे.

    दरवर्षीप्रमाणे यंदाही रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होणार आहेत. शिवाय कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य, शासकीय यंत्रणांची वाहने आणि अन्य व्यवस्थापनाशी संबंधित वाहने मोठ्या प्रमाणात या मार्गांवरून प्रवास करणार आहेत. अशा परिस्थितीत मुंबई-गोवा महामार्गावरील आधीच मोठ्या प्रमाणात असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघात किंवा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

    शिवभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुखकर व्हावा तसेच सोहळ्यादरम्यान कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी ही विशेष वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    दरम्यान, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने तसेच रुग्णवाहिका यांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.

    जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित यंत्रणांना अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed