Bandra Talao Revival: वांद्रेमधील नागरिकांच्या पसंतीच्या वांद्रे तलावच्या पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे लवकरच सरोवरासह आजूबाजूच्या परिसराचंही रूप बदलणार आहे.
दोन मुख्य टप्प्यात काम पूर्ण करणार
साडेसात एकर परिसरात पसरलेल्या या तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम २ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून ते दोन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात तलावातील सुमारे ७५० मेट्रिक टन गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. पाऊस वाढल्यास गाळ उपसण्याच्या कामात अडथळे येण्याची शक्यता असल्याने हे काम पूर्ण पुढील आठ ते १० दिवसांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तलावातील पाण्याची पातळी कमी करून गाळ काढल्यानंतर तलावातील सात नैसर्गिक झऱ्यांमधून पुन्हा स्वच्छ पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे तलावाची नैसर्गिक परिसंस्था पूर्ववत होण्यास मदत होईल, असा महापालिकेचा विश्वास आहे. दुसऱ्या टप्प्यात तलाव परिसर सुशोभित केला जाणार आहे. पदपथ, बसण्याची व्यवस्था, हिरवळ, प्रकाशयोजना आणि आकर्षक सार्वजनिक जागा तयार करून तलाव परिसराला पुन्हा एकदा नागरिकांच्या विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून ओळख दिली जाणार आहे.
Mumbai News: वांद्रेतील गरीबनगर परिसरात रिक्षाचालकांचा कब्जा, अतिक्रमण हटवल्यावरही कोंडी कायम; प्रवाशांची दररोज गैरसोय
प्लास्टिक, निर्माल्य, घरगुती कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूंमुळे तलावाचे पाणी दूषित झाले होते. काही भागांत दुर्गंधी इतकी वाढली होती की नागरिकांनी तलावाच्या परिसरात जाणेही कमी केले होते. देखभालीअभावी तसेच, कबुतरांचा वावर वाढल्याने होणाऱ्या अस्वच्छतेमुळे त्याचे सौंदर्यच हरवून गेले होते. ‘गाड्यांमधून उतरून काही जण येथे कबुतरांसाठी दाणे टाकतात. कधीकधी गोणीभर दाणे टाकले जातात. त्यामुळे येथे कबुतरांचा वावर वाढला आहे. ते खाण्यासाठी घुशी, उंदीरही येथे फिरतात, त्यामुळे हा परिसर अधिक अस्वच्छ होत आहे,’ असे एका स्थानिक महिलेने सांगितले.
स्थानिकांमध्ये उत्सुकता
तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कामामुळे स्थानिकांमध्येही उत्सुकता आहे. ‘लहानपणापासून आम्ही या तलावाकाठी खेळलो, फिरलो. पूर्वी येथील पाणी स्वच्छ होते, परिसरही नितळ दिसायचा. मात्र गेल्या काही वर्षांत कचरा आणि दुर्गंधीमुळे तलावाची ओळखच हरवली होती,’ असे शब्बीर खान सांगतात. फातिमा शेख यांच्या मते, सकाळच्या फेरफटक्यावेळी तलावाकडून येणारा वास असह्य व्हायचा. आता काम पूर्ण झाल्यावर परिसर पुन्हा लोकांनी गजबजलेला पाहायला मिळेल’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, हा केवळ तलाव नाही, तर परिसराच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग आहे, असे आरिफ सय्यद म्हणाले. मरियम कुरेशी यांच्या मते, सुशोभीकरणानंतर हा परिसर कुटुंबांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकतो. मुलांना घेऊन निवांत वेळ घालवण्यासाठी अशा जागांची गरज आहे,’ असे त्यांनी सांगितले.
‘शहर झपाट्याने बदलत असताना अशा ऐतिहासिक जलस्रोतांचे जतन होणे तितकेच गरजेचे आहे. पुनरुज्जीवनाच्या कामामुळे तलावाचे हरवलेले सौंदर्य परत येईल आणि हा जलवारसा पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवण्यासही मदत होईल’, असा विश्वास स्थानिक शैलेश पै यांनी व्यक्त केला.
Bandra News: वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर कोंडीमुक्त प्रवास, गरीबनगरमधील कारवाईनंतर रिक्षा-बसचं नियोजन, उन्नत मार्गासाठी प्रस्ताव
कमळ तलाव ते स्वामी विवेकानंद सरोवर
आज स्वामी विवेकानंद सरोवर म्हणून ओळखला जाणारा हा तलाव पूर्वी ‘लोटस टँक’ किंवा ‘कमळ तलाव’ म्हणून प्रसिद्ध होता. नवपाडा परिसरातील एका श्रीमंत कोकणी मुस्लिम दानशूर व्यक्तीने त्याची उभारणी केल्याची नोंद आहे. ‘मोठा सरोवर’ म्हणूनही ओळख असलेल्या या जलाशयाला ‘ग्रेड-दोन’ वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. १९९०च्या दशकात येथे पॅडल बोटिंग आणि मत्स्यपालनही होत असे.
