गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे. मुंबईजवळ समुद्राखाली बोगद्यामधून बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्यात येत आहे. दोन्ही राज्यांमध्ये प्रस्तावित स्थानकांचं बांधकाम सुरू आहे. पहिल्यांदाच पूर्णपणे भारतात तयार केलेली ही हाय-स्पीड ट्रेन 2027पर्यंत प्रवाशांसाठी खुली होईल अशी अपेक्षा आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी व्हायाडक्ट तयार केले जात आहेत.
पण हा प्रकल्पसुद्धा विलंबाच्या विळख्यात सापडला होता. भूसंपादनापासून, खर्चामध्ये होणारी वाढ ते अभियांत्रिकी संकटांपर्यंत बुलेट ट्रेनसमोर अनेक अडथळे आली. पण या सर्व अडथळ्यांना सामोरे गेल्यानंतर आता हा प्रकल्पा एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे. सरकारने वर्षानुवर्ष दाखवलेलं स्वप्न अखेर सत्यात उतरताना दिसतयं.
बुलेट ट्रेन प्रकल्पाची सुरुवात कशी झाली?
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या बांधकामाची सुरूवात 2017मध्ये जरी झाली असली तरी यासाठी अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होत्या. मुंबई ते अहमदाबाद रेल्वे मार्गावर दररोज व्यावसायिक, कर्मचारी मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर हाय-स्पीड रेल्वे मार्ग उभारण्याची आवश्यकता होती. जपानच्या शिंकांसेन सिस्टिमच्या सहाय्याने देशातील पहिला बुलेट ट्रेन कॉरिडोर विकसित केला जात आहे. जगातील सर्वात सुरक्षित आणि प्रगत तंत्रज्ञांपैकी हे एक आहे.
मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोर 508 किलोमीटर लांब असेल. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांसह दमन आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांमधून ही बुलेट ट्रेन धावणार. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या मार्गावर एकूण 12 स्थानकं असतील. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भारुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे. NHSRCLकडून या बुलेट ट्रेनचा विकास होत आहे.
या मार्गावरील बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने प्रवास करेल. मुंबई ते अहमदाबाद सुपरफास्ट प्रवास शक्य होणार आहे. सामान्य रेल्वेने या दोन शहरांमधील प्रवासासाठी 7 तास लागतात. सध्या वंदे भारतमुळे सर्वात वेगवान प्रवास शक्य आहे. कवेळ 5.30 तासांत अंतर पार होतं. बुलेट ट्रेनमुळे हाच प्रवास 2 तासांत पूर्ण होणार आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गाची निवड का केली?
भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई ते अहमदाबाद मार्गावर व्यावसायिक आणि उद्योजक प्रवास करतात. देशाच्या आर्थिक राजधानीमधून अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा सारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांदरम्यान जलद कनेक्टिव्हिटी निर्माण करणं आवश्यक होतं.
अनेक वर्षांच्या विलंबानंतर अखेर प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. 349 किलोमीटर लांब व्हायाडक्टचं काम पूर्ण झालं आहे. उन्नत मार्गावरील रुळांसाठी 443 किलोमीटर लांब मार्गांवर खांब उभारण्यात आले आहे. 90 टक्के मार्गिका उन्नत असेल. शिवाय 374 किलोमीटर लांब मार्गावर रेल्वे रुळ पडले आहेत. गुजरातमध्ये 350 किलोमीटर मार्गावर काम पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रात 74 किलोमीटर लांब मार्गावर पायाभरणी झाली आहे.
किती काम पूर्ण?
12 स्थानकांपैकी 8 स्थानकांवरील पायाभरणीचं काम पूर्ण झालं आहे. यामध्ये गुजरातमधील वापी, बिलिमोरा, सुरत, भारुच, आनंद, बडोदा, अहमदाबाद आणि साबरमती स्थानकांचा समावेश आहे. मुंबईमध्ये वांद्रे कुर्ला संकुल (BKC) येथे भूमिगत स्थानक उभारलं जात आहे. त्यासाठी खोदकाम पूर्ण होतं आहे. पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या बोगद्यासाठी 1.5 किलोमीचर लांब खोदकाम पूर्ण झालं आहे. विरार आणि बोईसर स्थानकांना या बोगद्याद्वारे जोडणार आहे. या मार्गावर तब्बल 7 डोंगराळ बोगदे आहे.
ठाणे ते मुंबई स्थानकांदरम्यान बोगद्याचं काम आव्हानात्मक आहे. ठाण्याच्या खाडीखालून देशातील पहिला पाण्याखालील रेल्वे बोगदा तयार करण्यात येत आहे. हा मार्ग 7 किलोमीटर लांब असेल. तसेच, घणसोली ते शिळफाटा मार्गावरील 4.8 किमी बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. याशिवाय तब्बल 17 नद्यांवरील पूलही उभारण्यात आले आहे.
बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा ऑगस्ट 2027मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. सुरत आणि बिलिमोरा मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. त्यानंतर वापी ते सुरत मार्ग, मग वापी ते अहमदाबाद, ठाणे ते अहमदाबाद आणि शेवटी मुंबई ते अहमदाबाद हा पूर्ण मार्ग सुरू होईल. यासाठी डिसेंबर 2029ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
