• Sun. Jun 14th, 2026

    अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 31, 2026
    अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    अहिल्यानगर, दि. ३१ मे :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही आणि समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती महोत्सवात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार रामराव वडकुते, आमदार सर्वश्री काशिराम दाते, मोनिका राजळे, सुनील कर्जतकर, गोपीचंद पडळकर, विठ्ठलराव लंघे, किरण लहामटे, हेमंत ओगले, अमोल खताळ, अक्षय कर्डिले, उत्तमराव जानकर, नारायण पाटील, बाबासाहेब देशमुख, सचिन कांबळे, तसेच माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आदी उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. महाराष्ट्राचा अभिमान, शौर्य, त्याग व समर्पण यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे अहिल्यादेवी होळकर होत. चौंडीची माती त्यांच्या जन्माने पावन झाली आहे. त्या न्यायप्रियता आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या युगप्रवर्तक होत्या. त्यांचा राज्यकारभार आदर्शवत होता. जनतेवर त्यांनी आईप्रमाणे माया केली. तीनशे वर्षांनंतरही देश त्यांचे स्मरण करत आहे. त्यांनी मानवधर्म जपला. अहिल्यादेवींनी अनेक वैयक्तिक आघात सहन केले; मात्र त्यातून खचून न जाता आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे. गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा शासनाने आयोजित केली. अहिल्यादेवी या दूरदृष्टी असलेल्या राज्यकर्त्या होत्या. त्यांनी समाजाच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.

    अहिल्यादेवी या हिंदुत्वाचा हुंकार व शौर्याचे प्रतीक होत्या. त्यांची न्यायप्रियता, लोककल्याणकारी राज्यकारभार व जनसेवेचा वारसा आपल्यासाठी आदर्श आहे. त्यांनी सत्तेपेक्षा सेवेला आणि वैभवापेक्षा जनकल्याणाला प्राधान्य दिले. आपल्या कार्यकाळात देशभरात मंदिरे, घाट, धर्मशाळा व जलसंवर्धनाची अनेक कामे उभी केली. जलसंवर्धन क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही मार्गदर्शक ठरते. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून जलसंवर्धनाचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या निधनाचे मोठे आघात सहन करूनही त्यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवत कर्मयोगी वृत्तीने जनसेवा केली, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्षे आदर्श राज्यकारभार केला. त्यांनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. देशभरातील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार स्वतःच्या निधीतून केला. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्य करताना त्यांनी लोकसेवा आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांचे कार्य आजही आदर्शवत मानले जाते. माहेश्वरी वस्त्रउद्योगाला चालना देऊन रोजगारनिर्मिती केली. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला.

    त्या पुढे म्हणाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःसाठी धनखर्च न करता समाजकल्याणासाठी संपत्तीचा उपयोग केला. त्यामुळेच त्यांना ‘लोकमाता’ म्हणून ओळखले जाते. गोदा ते नर्मदा या अहिल्यादेवी जलयात्रेचा शुभारंभ यावर्षी चौंडी येथून करण्यात आला.

    प्रास्ताविकात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचे विशेष महत्त्व आहे. जयंती महोत्सवानिमित्त तीन दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर लोककल्याण, न्यायनिष्ठ प्रशासन आणि समाजहितासाठी कार्य केले. त्यांच्या कार्यातून समाजाला आजही प्रेरणा मिळते. प्रत्येकाने त्यांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा आदर्श घेऊन समाजहितासाठी योगदान देण्याची गरज आहे.

    कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्यामुळे आजही संपूर्ण समाजाला प्रेरणा मिळत आहे. चौंडी ही केवळ त्यांची जन्मभूमी नसून प्रेरणास्थळ आहे. त्यांनी समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी केलेले कार्य आजही मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाच्या विकासासाठी व सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे.

    यावेळी खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनीही मनोगत व्यक्त केले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed