Eknath Shinde, Shrikant Shinde: आर्थिक संकटात सापडलेल्या नांदेडमधील शिवसैनिक माधव जाधव यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठा दिलासा दिला. निवडणुकीसाठी शेती विकणाऱ्या सैनिकाला शिंदेंनी मोलाची मदत दिली, ज्याची चर्चा सध्या राज्यभरात होत आहे.
कोण आहे हा शिवसैनिक ?
आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, हा हृदयस्पर्शी प्रसंग कोणासोबत घडला आहे, त्या शिवसैनिकाचे नाव आहे तरी काय? तर त्यांचे नाव आहे, माधव जाधव वडगावकर. शिवसैनिक माधव वडगावकर हे भोकर तालुक्यातील रहिवासी असून शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाप्रमुख पदावर कार्यरत आहेत. अनेक वर्षा पासून पक्षाचे काम करत आहेत. माधव यांना 22 गुंठे जमीन आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यासाठी त्यांनी 22 गुंठे जमीन विकली होती. शेती विकून आलेले पैसे निवडणुकीत खर्च केले, पण त्यांच्या पत्नीचा पराभव झाला. शेती विकल्यानंतर माधव वडगावकर हे रस्त्यावर आले. त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बाब शिवसेनेच्या नेत्यांना समजली, पण त्यांच्याकडून कुठलीच मदत मिळाली नाही.
शिंदेंनी परत मिळवून दिली जमीन
असे असताना देखील वडगावकर यांनी पक्षाप्रती असलेली निष्ठा कायम ठेवली. पक्षांच्या पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावायचे. महिन्याभरापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी नांदेड दौरा करत पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा निहाय आढावा बैठक घेतली. यावेळी आपल्या एका सामान्य कार्यकर्त्यावर ओढवलेली ही परिस्थिती आणि त्याची पक्षाप्रती असलेली निष्ठा ही बाब त्यांच्या कानावर आली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने मदतीचा हात पुढे केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी माधव यांना जमीन परत मिळवून दिली. विकलेली शेत जमीन परत मिळताच माधव यांना अश्रू अनावर झाले. चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. सध्या नांदेडसह संपूर्ण राजकीय वर्तुळात शिंदे पिता-पुत्रांच्या या संवेदनशीलतेची आणि सोबतच कार्यकर्त्याच्या निष्ठेची जोरदार चर्चा सुरू आहे.
Punjab Local Body Elections Result 2026: निवडणुकीपूर्वी 7 खासदार BJPत, तरी AAPची एकतर्फी बाजी! पंजाबमध्ये भाजप भुईसपाट, काँग्रेस चमकली
‘श्रीकांत शिंदे यांची पोस्ट’
दरम्यान, हृदयस्पर्शी प्रसंगानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक भावनिक पोस्ट केली. त्यांच्या डोळ्यांतील वेदना आणि पक्षासाठी केलेला त्याग पाहून मन अस्वस्थ झालं. पक्षासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या कार्यकर्त्याच्या आयुष्यात अन्याय राहू द्यायचा नाही, ही भावना मनात कायम होती. त्याच क्षणी ठरवलं, माधवजींना त्यांची 22 गुंठे जमीन पुन्हा मिळवून द्यायचीच. त्यानंतर तातडीने प्रयत्न सुरू केले आणि अखेर त्यांची विकलेली शेती पुन्हा त्यांच्याकडे सुपूर्द केली. आज माधवजी भेटायला आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यांतील समाधान आणि त्यांनी व्यक्त केलेले आभार हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहेत. कारण शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करणारी शिवसेना ही फक्त राजकारण नाही तर आपल्या माणसांसाठी जीवापाड उभं राहणारं एक कुटुंब आहे.
कार्यकर्ते पक्षासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावतात. त्यामुळे त्यांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं, हे कर्तव्यच आहे. एखाद्या शिवसैनिकाच्या आयुष्यात पुन्हा आनंद येताना पाहणं यापेक्षा मोठं समाधान दुसरं असूच शकत नाही, असं श्रीकांत शिंदे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
