• Sat. Jun 6th, 2026

    Tukaram Mundhe: जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही! तुकाराम मुंढेंचा धडाका! 3 दिवसांत 33 अटक, राज्यभरात 27 आस्थापनांना FDAचे टाळे

    Tukaram Mundhe: जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही! तुकाराम मुंढेंचा धडाका! 3 दिवसांत 33 अटक, राज्यभरात 27 आस्थापनांना FDAचे टाळे

    Tukaram mundhe fda action: आपल्या कडक भूमिकांमुळे प्रशासनात ज्यांची छाप आहे. ते तुकाराम मुंढे आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाले आहेत. त्यांनी आता घेतलेली कठोर कारवाईची भूमिका सध्या चर्चेत आली आहे. त्यांनी कामाचा पदभार हाती घेताच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारीच त्यांनी राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अवघ्या तीन दिवसांत अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक कारवाया करत ३३ आरोपींना अटक केली असून २७ आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे.

    २५ ते २८ मेदरम्यान राबवण्यात आलेल्या या मोहिमेत भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली. बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत कारवाया करण्यात आल्या.

    कोणावर मोठी कारवाई

    राज्यातील ५३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४ ठिकाणी नियमभंग आढळून आला. याप्रकरणी २५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पाच वाहने जप्त करण्यात आली असून सुमारे २०.५७ लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. बृहन्मुंबई विभागात सर्वाधिक कारवाई झाली. येथे १९ आस्थापना सील करण्यात आली असून १९ जणांना अटक करण्यात आली आहे.

    दूध, आंबे, आईस्क्रीमपासून नूडल्सपर्यंत तपासणी

    या मोहिमेत केवळ गुटखाच नव्हे, तर पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, खाद्यतेल, फरसाण, आईस्क्रीम, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन आणि बेकरी पदार्थांची तपासणी करण्यात आली. संशयित २८.७८ लाख रुपयांचा साठा जप्त करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

    कुठे काय आढळलं?

    जळगावमध्ये गायीच्या दुधात खाद्यतेल मिसळून कृत्रिम दूध तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. पुण्यात इथिलीन रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे जप्त करण्यात आले.

    धुळे जिल्ह्यात अस्वच्छ वातावरणात मटर बेसन उत्पादन सुरू असल्याचे आढळले. धारावीत लेबलिंग नियमांचे उल्लंघन करून नूडल्स उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले. नाशिकमध्ये बनावट लेबलिंग आणि परवान्याशिवाय उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. तर पालघरमध्ये अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या आईस्क्रीम उत्पादन केंद्रावर छापा टाकून लाखोंचा साठा जप्त करण्यात आला.

    ‘आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही’

    “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि असुरक्षित अन्न उत्पादनाविरोधातील कारवाई अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल,” असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

    दरम्यान, तक्रारी तत्काळ नोंदवता याव्यात यासाठी लवकरच नवीन मोबाईल अॅप आणि टोल-फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा