• Sun. Jun 7th, 2026

    MLC Election: विधानपरिषदेच्या तीन जागांवरून महायुतीत संघर्ष, वाद थेट अमित शहांपर्यंत गेला; नाशिकसह आणखी कोणत्या दोन ठिकाणी चढाओढ?

    MLC Election: विधानपरिषदेच्या तीन जागांवरून महायुतीत संघर्ष, वाद थेट अमित शहांपर्यंत गेला; नाशिकसह आणखी कोणत्या दोन ठिकाणी चढाओढ?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन तीन दिवस लोटले तरी, महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप ठरत नसल्याने इच्छुकांची चलबिचल वाढली आहे. तर नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा भाजपला हवी आहे. त्यामुळे हा वाद जागेवरून महायुतीचे घोडे अडले असून, हा वाद थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत पोहोचला आहे. महाविकास आघाडीतही नाशिकची जागा शिवसेना ‘उबाठा’ने लढावी की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने, याबाबत उद्या, शुक्रवारी (दि.२९) निर्णय होण्याची शक्यता आहे.

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या जागेसाठी सोमवार (दि.२५)पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र, महायुतीत जागावाटपाचा पेच अद्याप सुटत नसल्याचे चित्र आहे. महायुतीत १७ पैकी १४ जागांच्या जागावाटपाचा पेच सुटल्यात जमा आहे. दुसरीकडे नाशिकसह छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या तीन जागांचा पेच कायम आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या मंगळवारी (दि. २६) रात्री झालेल्या बैठकीतही तोडगा निघालेला नाही. भाजपने संख्याबळाच्या आधारे नाशिकच्याही जागेवर दावा ठोकला आहे. तर, शिवसेना शिंदे गट नाशिकवरचा दावा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे भाजपने नाशिकच्या बदल्यात छत्रपती संभाजीनगरची मागणी केली आहे. ‘शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडून पुण्याची जागा मागितली आहे. या दोनच गोष्टींवर आमचे अडले आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिकची जागा भाजप लढणार की, शिवसेना याचा ‘सस्पेन्स’ अद्यापही कायम आहे.

    …यांच्याकडून अर्ज खरेदी

    विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीसाठी बुधवारी तिसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षातून दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुक निवृत्ती बोडके, भाजपकडून इच्छुक बाळकृष्ण माळी, भूषण कासलीवाल यांनी अर्ज खरेदी केले. याशिवाय विजय धारराव यांनी अपक्ष अर्ज खरेदी केला.

    नाशिकच्या जागेवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना चांदवडमधून भाजपचे नेते भूषण कासलीवाल यांनीही विधान परिषदेसाठी अर्ज घेतला आहे. कासलीवाल यांनी थेट गुजरात ‘कनेक्शन’ वापरले आहे. तर मुख्यमंत्र्यांनीही नाशिकचा निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे.

    दरम्यान, दुसरीकडे, जळगाव विधान परिषदेची जागा सध्या भाजपकडे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे वर्चस्व आहे. मात्र, त्यात भाजपकडील मतांची संख्या जास्त असल्याने जागा आपल्याकडेच रहावी यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील, नंदकुमार अडवाणी, पाचोऱ्याचे पदाधिकारी अमोल शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील इच्छुक आहेत. त्यामुळे शिवसेनेनेदेखील जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप जागा देणार नसेल, तर मैत्रीपूर्ण लढण्याची तयारीही शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed