म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या ५० मीटर रुंदीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, कान्हा हॉटेल चौक ते खडी मशिन चौक या पुढील भागासाठी आवश्यक जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आली नसल्याने संपूर्ण प्रकल्पाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कात्रज ते कोंढवा (खडी मशिन चौक) या साडेतीन किलोमीटर लांबीच्या मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महापालिकेने ५० मीटर रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या १०९ मिळकतींपैकी १०० मिळकती महापालिकेने ताब्यात घेतल्या असून, उर्वरित नऊ मिळकतीही लवकरच ताब्यात येतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
कात्रज-कोंढवा मार्गावरील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या रस्त्यावर दररोज तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने २०१७मध्ये ८४ मीटर रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर केला होता. मात्र, भूसंपादनातील अडचणी, जागेचा अभाव आणि मोबदल्याच्या वादामुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला. छोट्या मिळकतधारकांना ‘टीडीआर’ किंवा ‘एफएसआय’चा लाभ प्रत्यक्षात मिळण्यात अडचणी येत असल्याने त्यांनी रोख मोबदल्याची मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेने थेट आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले होते. महसूल विभागाच्या मंजुरीनंतर एप्रिल २०२६पासून भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली.
वर्षभर कोंडीचा त्रास
महापालिकेच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या भागातील भूसंपादन पूर्ण होण्यासाठी एक ते दीड वर्ष लागू शकते. परिणामी, कात्रज ते खडी मशिन चौक या मार्गाचे रुंदीकरण चालू वर्षात पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना आणखी काही काळ सहन करावा लागेल.
पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरू असले, तरी कान्हा हॉटेल चौक ते खडी मशिन चौक या पुढील भागातील परिस्थिती अद्याप अनिश्चित आहे. कान्हा हॉटेल चौकातील अंडरपासचे काम पूर्ण झाले असले, तरी पुढील ८४ मीटर रुंदीकरणासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा