• Sun. Jun 14th, 2026
    Marathi Compulsion: RTO कडून रिक्षाचालकांची ‘मराठी परीक्षा’ सुरू! रस्त्यावर उतरली पथकं; सरनाईकांनी दिलेली मुदत संपण्यापूर्वीच धडक मोहीम

    ठाण्यात आरटीओकडून रिक्षाचालकांच्या मराठी ज्ञानाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेनंतर रिक्षाचालकांजवळील कागदपत्राचीही तपासणी केली जात आहे. त्याशिवाय मराठीत संवाद साधण्याची क्षमताही तपासली जात असून १५ ऑगस्टनंतर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: राज्यातील रिक्षाचालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षाचालकांना मराठी येणे आवश्यकच असल्याची आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे. ठाण्यात आरटीओने विशेष आणि धडक तपासणी मोहीम सुरू केली असून, रस्त्यांवर रिक्षाचालकांच्या मराठी ज्ञानाची थेट परीक्षा घेतली जात आहे. मराठी सक्तीच्या अधिकृत अंमलबजावणीला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली, तरी ठाणे आरटीओच्या पथकांनी शहरातील विविध भागांमध्ये अचानक तपासणी सुरू केल्याने परप्रांतीय आणि अमराठी रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत.

    काय काय तपासले जात आहे?

    प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकांकडून ठाणे शहरातील विविध भागांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवली जात आहे. यावेळी रिक्षाचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स, बॅज, वाहन नोंदणी कागदपत्रे आणि इतर परवान्यांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर चालकांना मराठीत संवाद साधण्यास सांगितले जात असून त्यांना भाषा समजते का आणि ते मराठीत संवाद करू शकतात का, याची चाचणीही घेतली जात आहे.

    रिक्षाचालकांच्या प्रतिक्रिया काय?

    या मोहिमेबाबत रिक्षाचालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही चालकांनी स्थानिक भाषेचा वापर वाढवण्यासाठी हा उपक्रम योग्य असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी कारवाईच्या भीतीमुळे नाराजी व्यक्त केली आहे. १५ ऑगस्टनंतर मराठी भाषा न बोलणाऱ्या किंवा आवश्यक नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने अनेक चालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

    Maharashtra TimesUdayanraje Bhosale: ‘इतर कामांसाठी निधीच उरत नाही…’; लाडकी बहीण योजनेवर उदयनराजे स्पष्टच बोलले!

    दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय स्तरावरही मतभेद समोर आले होते. शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी सक्ती आणि दंडात्मक कारवाईला विरोध दर्शवला होता. तसेच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही या निर्णयाच्या कायदेशीर बाजूंवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि वाहनचालक प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली होती. त्यात मराठी सक्तीच्या अंमलबजावणीला १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

    आरटीओच्या या मोहिमेचा उद्देश काय?

    आरटीओ अधिकारी राकेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेचा उद्देश प्रवाशांची सुरक्षितता, कागदपत्रांची पडताळणी आणि स्थानिक भाषेचा वापर वाढवणे हा आहे. ठाण्यात पुढील काही दिवस ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा