• Thu. Jun 18th, 2026

    Gokul Election : ‘गोकुळ’च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू, ठराव सादर करण्याची मुदत 1 जुलैपर्यंत, संपूर्ण राज्याचं लक्ष एकवटणार

    Gokul Election : ‘गोकुळ’च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू, ठराव सादर करण्याची मुदत 1 जुलैपर्यंत, संपूर्ण राज्याचं लक्ष एकवटणार

    कोल्हापुरातील प्रतिष्ठीत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगूल अखेल वाजलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळच्या निवडणुकीबाबत चर्चा सुरु होती. अनेक जण या निवडणुकीची वाट पाहत होते. अखेर ही निवडणूक प्रक्रिया आता प्रत्यक्षात अंमलात येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठ्या दूध संघांपैकी एक असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 2026–2031 या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया अधिकृतरीत्या राबविण्यात येऊ लागली आहे. पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक आणि जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी जारी केलेल्या आदेशानुसार मतदार यादी निश्चितीचा प्रशासकीय कार्यक्रम लागू करण्यात आला आहे. यामध्ये संलग्न प्राथमिक सहकारी दूध संस्थांनी आपल्या प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव 1 जुलै 2026 या अंतिम मुदतीपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

    सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी लागू असलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 अंतर्गत ही विहित प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अधिनियम आणि नियमांत निर्देशित तरतुदीनुसार, प्रथम आदेशानुसार संबंधित प्राथमिक सहकारी दूध संस्थांना 26 मे ते 1 जून 2026 या कालावधीत पत्राद्वारे प्रतिनिधी नियुक्तीबाबत सूचना पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित संस्थांनी आपल्या संचालक‑पदावरील प्रतिनिधी ठरवणारे ठराव 2 जून ते 1 जुलै 2026 या कालावधीत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या तात्पुरत्या कार्यालयात, ताराबाई पार्क येथे, दाखल करणे आवश्यक आहे.

    निवडणूक प्रक्रियेच्या आधीच्या टप्प्यात प्राथमिक मतदार यादीची रूपरेषा तयार करण्यासाठी संबंधित प्राथमिक सहकारी दूध संस्थांच्या प्रतिनिधी आणि सभासद यांची अंतिम यादी निश्चित करण्यात येईल. त्यानंतरच अंतिम निवडणूक कार्यक्रम, उमेदवारी अर्जाची तारीख आणि त्यानंतर मतदान दिनक्रम जाहीर करण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी नमूद केली आहे.

    स्थानिक पातळीवर राजकारण शिगेला पोहोचण्याची शक्यता

    स्थानिक राजकीय वर्तुळात गोकुळ निवडणुकीवरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे आमदार शिवाजी पाटील तसेच गर्जना संघटनेचे नेते प्रकाश बेलवाडे यांच्यात झालेल्या आरोप-प्रत्यारोप यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. तर सध्या पाच सदस्यीय प्रशासक मंडळ संघाचा कारभार सांभाळत आहे. तसेच, 1320 प्राथमिक दूध संस्थांविरुद्ध दाखल असलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सर्किट बेंचने त्या संस्थांच्या सुनावणीचे आदेश देऊन सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्या सुनावण्यांनंतरच अंतिम पात्र संस्थांचा निकाल आणि अखेरचे मतदानाची तारीख आणि कार्यक्रम जाहीर केला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    कोल्हापूरच्या राजकारणात रंगतदार गोष्टी घडणार

    दरम्यान निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कायदेशीरता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय पावले उचलली जात आहेत. मतदार यादीच्या आधारेच संस्थांमधील संघर्ष आणि पुढील राजकीय समीकरणे आखली जाईल. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने येत्या काही आठवड्यांत गोकुळच्या राजकारणात अधिक रंगतदार गोष्टी नक्कीच पाहायला मिळणार आहेत. तर सहकार क्षेत्राबरोबरच राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष गोकुळच्या या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा