• Sun. Jun 7th, 2026

    ‘हार्बर एसी’ला उदंड प्रतिसाद; पंधरवड्यात प्रवासी संख्या साडेतीन लाखांनजीक, CSMT ते पनवेल प्रवास गारेगार

    ‘हार्बर एसी’ला उदंड प्रतिसाद; पंधरवड्यात प्रवासी संख्या साडेतीन लाखांनजीक, CSMT ते पनवेल प्रवास गारेगार

    Harbour Line: 26 जानेवारी रोजी हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू केली असून वाढत्या प्रतिसादामुळे 1 मेपासून फेऱ्या वाढवण्यात आल्या. त्यानंतर 15 दिवसांतच प्रवाशांच्या संख्येत 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: हार्बर मार्गावरील वाढीव वातानुकूलित लोकल फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मे महिन्यात १४ अतिरिक्त एसी लोकल फेऱ्या सुरू केल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत प्रवासीसंख्येत जवळपास ६५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि वाशी मार्गावरील प्रवासी वातानुकूलित लोकलकडे वळत आहेत.

    अतिरिक्त फेऱ्यांना मोठा प्रतिसाद

    हार्बर मार्गावर २६ जानेवारीपासून एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, सुरुवातीला फेऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यातच काहीवेळा होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार १ मेपासून १४ अतिरिक्त वातानुकूलित फेऱ्या सुरू करण्यात आल्या.

    Maharashtra TimesMumbai Local: स्थानकावरून सुटताच लोकल ट्रेन बंद पडली; मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा, कसारा-कल्याण मार्गावर सेवा ठप्प

    १६ एप्रिल ते ३० एप्रिल आणि १ मे ते १५ मे या दोन पंधरवड्यांच्या तुलनेत एसी लोकलमधील प्रवासीसंख्या २.३४ लाखांवरून ३.८६ लाखांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच फेऱ्या वाढवल्यानंतर प्रवासीसंख्येत ६४.९७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

    महसुलात वाढ

    ‘पूर्वी वेळा जुळत नसल्याने एसी लोकलचा वापर कमी होता. मात्र आता पर्याय वाढल्याने प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे. गर्दीतून काहीसा दिलासा मिळत असून आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रवासी गणेश देशमुख यांनी दिली. एसी लोकलच्या वाढत्या वापरामुळे महसुलातही वाढ झाली आहे. हार्बर मार्गावरील एसी फेऱ्यांमधून मिळणारा महसूल १.१८ कोटी रुपयांवरून १.९६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून त्यात ६६.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

    दरम्यान, एसी लोकलमधील विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. स्थानके आणि एसी लोकलमध्ये नियमित तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या मध्य रेल्वेच्या एसी लोकल फेऱ्यांची संख्या १०८ वर पोहोचली असून त्यामध्ये मुख्य मार्गावरील ८० आणि हार्बर मार्गावरील २८ फेऱ्यांचा समावेश आहे.

    Maharashtra TimesPune Metro: महामार्गावरून शहरापर्यंत थेट मेट्रोने प्रवास! पुण्यात लाइन 1 आणि 2चा विस्तार सुरू; कुठे-कशी असतील स्थानकं?

    विनातिकीट प्रवाशांना चाप

    एसी लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुकर व्हावा, तसेच विनातिकीट प्रवाशांना आळा बसावा यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कंबर कसली आहे. एसी लोकल आणि स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून जरब बसवला जात आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा