• Sun. Jun 14th, 2026

    केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 24, 2026
    केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. २४ : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावेत या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईतील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालय येथे अत्याधुनिक ‘हाय-एंड व्हेसल सीलर’ (Vessel Sealer) उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे शस्त्रक्रियांच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होणार आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा मिळणार आहेत. या सीएसआर प्रकल्पांतर्गत दोन प्रगत इलेक्ट्रोसर्जिकल युनिट्स जनरल सर्जरी विभागासाठी ‘इलेक्टिव्ह सर्जरी ओटी’ जमेशदजी मेहता शस्त्रक्रिया कक्षामध्ये बसविण्यात आले आहेत.

    केईएम रुग्णालय हे मुंबईतील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य संस्थांपैकी एक असून येथे दररोज हजारो गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. अशा परिस्थितीत अत्याधुनिक उपकरणांची गरज अत्यंत महत्त्वाची होती. नव्याने बसविण्यात आलेली ही उपकरणे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणार असून रक्तवाहिन्या सील करून रक्तस्राव त्वरित थांबवण्यास मदत करतात. या उपकरणांमुळे शस्त्रक्रियेची अचूकता वाढेल, गुंतागुंत कमी होईल आणि रुग्णांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ होईल. विशेषतः जटिल शस्त्रक्रियांमध्ये रक्तस्राव कमी होऊन डॉक्टरांना अधिक कार्यक्षमतेने उपचार करता येणार आहेत. या उपक्रमासाठी इंडियन ऑइल कंपनीने सहकार्य केले आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले आहेत.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले की, ‘राज्यातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणे ही शासनाची प्राथमिकता आहे. अशा प्रकल्पांमुळे सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता वाढून गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळतो.’ या उपक्रमामुळे केवळ आरोग्य सेवेची गुणवत्ता उंचावणार नाही, तर गरीब आणि वंचित घटकांसाठी आधुनिक वैद्यकीय सुविधांचा मार्गही अधिक सुलभ होणार आहे.

    000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed