Mumbai Pune Missing Link Tushar Bhumkar Accident Update News : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील बोगद्यात पुण्यातील तुषार भुमकर यांच्या अपघाताबाबात एक मोठी अपडेट समोर आली आहे. बेजबाबदारपणे उभ्या करून ठेवलेल्या वाहनांमुळेच हा अपघात झाला असल्याचं समोर आलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसलं?
समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये अपघाताचा संपूर्ण थरार आणि त्यामागचं मुख्य कारण स्पष्टपणे कैद झालं आहे. बोगद्याच्या आतमध्ये, उजव्या बाजूच्या लेनमध्ये काही गाड्या आधीपासूनच बेकायदेशीरपणे उभ्या असल्याचं स्पष्ट दिसत आहे. रात्रीच्या वेळी सुमारे 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास तुषार भूमकर यांची काळ्या रंगाची फॉर्च्युनर कार अतिशय वेगात बोगद्यात प्रवेश करते. मात्र, समोरच गाड्या उभ्या असल्याचं अचानक दिसल्यानं अडथळा निर्माण होतो. उभ्या असलेल्या गाड्यांपासून वाचण्यासाठी फॉर्च्युनर कार अचानक लेन बदलते. मात्र, त्याचवेळी मधल्या लेनमधून एक मालवाहू टेम्पो संथ गतीने पुढे जात असतो. भरधाव वेगात असलेली फॉर्च्युनर कार अनियंत्रित होऊन थेट या मालवाहू टेम्पोवर पाठीमागून अत्यंत जोरात आदळते. ही धडक इतकी भयंकर आणि जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचं आणि गाडीचे तुकडे उडाल्याचे व्हिडीओत पाहायला मिळतं. यातच ड्राइव्हरच्या शेजारी बसलेल्या तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Missing Link Accident Video : भरधाव फॉर्च्युनरची टेम्पोला जोरदार धडक, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा अपघात; पुण्याच्या तुषार भुमकरचा मृत्यू
काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दुर्घटनेत फॉर्च्युनर कारमधील तुषार भुमकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. कारमध्ये त्यांच्यासोबत असलेले इतर प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. सुदैवाने, अन्य प्रवाशांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून बोगद्यातील वाहतूक कोंडी फोडण्यात आली. तसेच, भूमकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
Nanded News : हरभरा बियाणं वाचवण्याच्या नादात दोन चिमुकल्या लेकी गेल्या, एका गोष्टीमुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; आई-बापाचा आकांत
सामाजिक-राजकीय क्षेत्रात वावर
तुषार भूमकर हे पिंपरी-चिंचवड आणि वाकड परिसरातील एक सक्रिय युवा नेतृत्व होतं. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा वावर होता. त्यांच्या पत्नीने नुकतीच काँग्रेसच्या तिकिटावर पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकही लढवली होती. त्यांच्या या अचानक आणि अपघाती जाण्याने संपूर्ण वाकड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे. अतिवेगाच्या एक्स्प्रेस वेवर आणि विशेषतः बोगद्यासारख्या धोकादायक ठिकाणी गाड्या पार्क करण्याच्या या बेजबाबदारपणावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिसांकडून आता या सीसीटीव्हीच्या आधारे बोगद्यात गाड्या कोणी आणि का उभ्या केल्या होत्या, याचा सखोल तपास करण्यात येत आहे.
