मुंबई: जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात काही दिवसांपासून इंधन टंचाईची चर्चा असून राज्यातही पेट्रोल पंपांवर याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी तर गर्दीमुळे हाणामारीचे प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलची कोणत्याही प्रकारची टंचाई नसून शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावू नयेत, असं भरणे यांनी म्हटलं आहे.
इंधन टंचाईबाबत बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, “पेट्रोल-डिझेलची टंचाई असल्याची अफवा पसरल्याने मागी काही दिवसांपासून डिझेलचा खप २० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे गैरसोई होऊन शेतकरी पेट्रोल पंपांवर रांगा लावत आहेत. डिझेलची टंचाई नसून शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावू नयेत. एखाद्या पेट्रोल पंपावर जर डिझेल विक्रीसाठी कोणी शेतकऱ्यांकडे सातबाऱ्याची मागणी करत असेल तर याबाबतची तक्रार सदर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी. आपण तत्काळ अशी मागणी करणाऱ्या पेट्रोल पंपांवर कारवाई करू,” अशा शब्दांत दत्तात्र्यय भरणे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं आहे.
दरम्यान, डिझेलची टंचाई नसल्याचा दावा कृषीमंत्र्यांकडून केला जात असला तरी विविध जिल्ह्यांतील पेट्रोल पंपांवर मात्र वेगळीच स्थिती पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र इंधनटंचाईचे सावट असून, मराठवाड्यात इंधनाअभावी अनेक पेट्रोलपंप कोरडेठाक झाले आहेत. ट्रॅक्टर्सनी वेगाने मशागत होत असल्यामुळे शेतात बैलजोड्यांद्वारे मशागत करणे कमी झाले आहे. मात्र, डिझेलच्या टंचाईमुळे ट्रॅक्टर चालविणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मशागती खोळंबल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक तालुक्यांतील शेतकऱ्यांनी डिझेल घेण्यासाठी आपला मोर्चा नांदगाव तालुक्यातील पेट्रोलपंपांकडे वळविला आहे. पेट्रोल पंपांवर कॅन आणि ड्रमच्या रांगा लागत असून, प्रत्येक शेतकऱ्याला तीन ते पाच हजारांचे डिझेल या पंपावरून देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
तहानभूक विसरून सकाळपासूनच शेतकरी डिझेल घेण्यासाठी पंपांवर गर्दी करत आहेत. शेतमालाला योग्य दर नाही, कांद्याचे भाव सातत्याने कोसळत असतात. कवडीमोल भावात कांदे विकावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर आता ऐन खरिपाच्या तोंडावर डिझेलटंचाई झाल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. किमान खरिपाच्या मशागतीसाठी तरी सरकारने शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. डिझेलसाठी गर्दी करणाऱ्यांत संभाजीनगर जिल्हा ग्रामीण भागासह वैजापूर तालुक्यातील नांदगावलगत असलेल्या शिऊर, नारळे, पारळे, या ठिकाणच्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून येत आहे.
छगन भुजबळांकडून सारवासारव!
राज्यात एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा उपलब्ध असल्याच्या भुजबळ यांच्या विधानानंतर, राज्यात पुरेसा इंधनसाठा शिल्लक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर आता भुजबळ यांनीही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘पंतप्रधान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे’, असं आवाहन छगन भुजबळ यांनी काल केलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा