• Sat. Jun 6th, 2026

    Sunetra Pawar: पुण्यात ‘महायुती’त धुसफूस! भाजपकडून दुजाभावाचा आरोप; सुनेत्रा पवारांसमोर नगरसेवकांकडून तक्रारींचा पाढा

    Sunetra Pawar: पुण्यात ‘महायुती’त धुसफूस! भाजपकडून दुजाभावाचा आरोप; सुनेत्रा पवारांसमोर नगरसेवकांकडून तक्रारींचा पाढा

    Sunetra Pawar: बारामती होस्टेल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला.

    सुनेत्रा पवार, बारामती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाकडून मिळणाऱ्या ‘दुय्यम’ वागणुकीविरोधात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा संयम सुटला आहे. जाणीवपूर्वक भाजपचे नेते ‘राष्ट्रवादी’ च्या प्रभागांचा विकासनिधी रोखत असल्याचा थेट आरोप करून नगरसेवकांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे धाव घेतली.

    नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर ‘महायुती’चा सुबक संसार सुरू असल्याचे दाखवले जात असताना, अंतर्गत पातळीवर मात्र भाजपने ‘राष्ट्रवादी’ची कोंडी करण्याचे धोरण आखल्याचे या तक्रारींवरून समोर आले आहे. दरम्यान, या तक्रारींसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन सुनेत्रा पवारांनी नगरसेवकांना दिल्याचे समजते. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय वजन कमी झाल्याची भावना नगरसेवकांमध्ये होती. ‘अजितदादा असताना आमचे प्रश्न तातडीने सुटायचे, आता प्रशासन आणि भाजपकडून आम्हाला कोणी विचारत नाही,’ अशी खंत अनेक नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन पुण्यातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केल्याने ‘राष्ट्रवादी’त पुन्हा हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. बारामती होस्टेलमधील बैठकीला शहराध्यक्ष सुनील टिंगरे, विरोधी पक्षनेते अॅड. नीलेश निकम, दत्ता धनकवडे आदी उपस्थित होते.

    Maharashtra TimesNEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात अजब योगायोग! पुण्यातून तिसरी ‘मनीषा’ जेरबंद, चक्रावणारा खेळ समोर
    दादांची शैली कायम ?
    अजित पवार उपमुख्यमंत्री असताना दर शुक्रवारी पुण्यातील प्रश्नांवर स्वतंत्र बैठका घेत असत. महापालिकेतील कामे, निधी, अधिकाऱ्यांची कार्यपद्धती आणि विकास प्रकल्पांचा ते थेट आढावा घेत असत. आता सुनेत्रा पवार यांनीही त्याच धर्तीवर पुण्यात दिवसभर बैठकांचा धडाका लावल्याने ‘दादांची शैली कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी चर्चा ‘राष्ट्रवादी’च्या गोटात रंगली आहे.

    नगरसेवकांना कानमंत्र

    महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जनतेच्या आणि शहराच्या प्रश्नांवर अत्यंत संयमी भाषेत; पण तितक्याच आक्रमकपणे आवाज उठवा. विरोधकांवर किंवा प्रशासनावर टीका करताना तुमचे विषय अभ्यासू आणि पुराव्यासहित मांडले पाहिजेत. शेवटच्या क्षणी येणाऱ्या ‘आयत्या वेळच्या’ विषयांना स्पष्ट विरोध करा. नगरसेवकांनी आधी विषयांचा सखोल अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या, अशा शब्दांत पवारांनी नगरसेवकांना कानमंत्र दिल्याचे समजते.
    Maharashtra TimesPune Crime: शेकरु अन् स्टार कासवाच्या तस्करीचा पर्दाफाश; पुणे रेल्वे स्थानक परिसरात DRIची कारवाई, दोन आरोपी ताब्यात
    दादांच्या आठवणीने डोळे पाणावले !
    या बैठकीदरम्यान बारामती होस्टेलमध्ये भावुक वातावरण तयार झाले होते. बैठकीदरम्यान नगरसेवकांनी पुण्याच्या विकासातील अजितदादांच्या योगदानाच्या आणि कामाच्या आठवणी काढल्या. पुण्याचा कायापालट करण्यासाठी अजितदादांनी घेतलेले कष्ट आणि प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेली ताकद यावर बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह उपस्थित महिला नगरसेविकांचे डोळे पाणावले होते. या वेळी स्वतःला सावरत सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘दादांनी पुण्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी खूप मोठी कामे केली आहेत. त्यांचा हाच विकासाचा वारसा आणि हीच कामे आपल्याला एकजुटीने पुढे घेऊन जायची आहेत.’

    … म्हणून तीन महिने बैठक घेतली नाही

    नगरसेवकांची नाराजी ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ‘अजितदादांच्या निधनानंतर लागलेली पोटनिवडणूक, त्यानंतर पक्ष संघटनेतील कायदेशीर प्रक्रिया आणि तांत्रिक बाबींमुळे गेल्या तीन महिन्यांत मला तुमच्यासोबत अधिकृत बैठक घेता आली नाही. मात्र, आगामी काळात पालिकेतील सर्व गोष्टी सुरळीत होतील. मी स्वतः या संपूर्ण विषयात लक्ष घातले आहे. महापालिकेतील निधीवाटप आणि दुय्यम वागणुकीच्या गंभीर प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईत उच्चस्तरीय चर्चा करून हे प्रश्न तातडीने सोडविले जातील,’ असे ठोस आश्वासन त्यांनी नगरसेवकांना दिले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा