• Mon. Sep 7th, 2026
शरद पवारांची भेट, पार्थ पवारांच्या तक्रारीची आणि नाराजीची चर्चा, अखेर Sunil Tatkare यांनी सगळं सांगितलं

सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व विषयांवर अतिशय मुद्देसूद उत्तरे दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता नव्याने हुंकार भरला जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्याआधी त्यांनी पक्षांतर्गत घडामोडी आणि विविध चर्चांवर रोखठोक भूमिका मांडली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी गेल्या काही दिवसांपासूनच्या सर्व घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आली होती. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या देखील चर्चा समोर आल्या होत्या. अखेर या सर्व चर्चांवर सुनील तटकरे यांनी आपली अधिकृत भूमिका मांडली. “शरद पवार यांना खोकल्याचा आणि दम्याचा त्रास झाल्यानंतर त्यांना वारंवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे शरद पवार यांना भेटावं अशी इच्छा होती. यामुळे शरद पवार यांची भेट मिळावी म्हणून इच्छा व्यक्त केली होती. मधल्या कालावधीत वेळ मिळाला तेव्हा मी दौऱ्यावर होतो आणि मी मुंबईत होतो तेव्हा शरद पवार दौऱ्यावर होते”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

“नेमकं नवनिर्वाचित उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर मुंबईला परतल्यावर शरद पवारांकडून निरोप आला की, दुसऱ्या दिवशी मी असेल तर भेट होऊ शकते. पण दुसऱ्या दिवशी माझ्या मतदारसंघात मंत्री नितेश राणे यांचे कार्यक्रम होते. संध्याकाळी पनवेलमध्ये अमृत महोत्सवचा कार्यक्रम होता. त्यानंतर त्यादिवशी मला विचारण्यात आलं की, आज वेळ आहे का? म्हणून मी शरद पवार यांना भेटायला गेलो. दहा मिनिटे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. होण्याचं काही कारण उद्भवतच नाही”, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केली.

पार्थ पवारांची शरद पवारांकडे तक्रार केली?

“शरद पवारांची प्रकृती आणि आम्ही सबंध जे काही फिरतो त्याबद्दल चर्चा झाली. याबद्दल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणती चर्चा होण्याचं कारण नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. मी सुद्धा स्वत:ला एका शिस्तीत बाळगणारा कार्यकर्ता आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करतो. अशावेळेला कोणतीही चर्चा झाली. त्यामुळे कुणाबद्दल तक्रार करणं हा विषयच उद्भवत नाही”, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.

“शरद पवारांनी कुणाला काय सल्ला द्यावा हा अधिकार त्यांनी सहा दशकांच्या कामांमधून वडिलकीच्या नात्यातून मिळवणार. मी १९८७-८८ पासून शरद पवार यांच्यासोबत काम करत आहे. माझ्या कामांची माहिती असल्यामुळे शरद पवारांनी मोठ्या मनाने ते वक्तव्य केलेलं असेल”, अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली.

पार्थ पवार यांच्याबद्दल तटकरे काय म्हणाले?

“पार्थ पवार यांच्याबद्दल तक्रारीचं काय कारण आहे? एकतर पार्थ पवार आणि जय पवार हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अकाली निधनानंतर सक्रीय राजकारणात सहभागी आहेत. पूर्वी ते राजकारण होते का? तर होते. पण सक्रीय होणं, जसं मी 1977-78 पासून पुलिंग एजंट, बुथ एजंट म्हणून काम केलं. पण 1984 ला माझ्या वडिलांचं निधन झालं, मग मी तालुका काँग्रेसचा सरचिटणीस झालो, तालुका काँग्रेसचा अध्यक्ष झालो, जिल्ह्याचा झालो. तसं आता अजित दादांच्या अकाली निधनानंतर पार्थ असतील किंवा जय असतील हे सक्रीय राजकारणत आहेत. हे तरुण नेतृत्व आहेत. त्यांच्याबद्दल तक्रार असण्याचं कारणच काय?”, असं सुनील तटकरे म्हणाले.

“उलट अजित दादांसोबत आम्ही दीर्घ काळ राजकीय प्रवास केला असल्यामुळे योग्यवेळेला योग्य मार्गदर्शन, त्यांची काय भूमिका असेल ते, आम्हाला काय वाटतं ते आम्ही समजून घेऊन पक्षांतर्गत वाटचाल करत असतो. आम्हाला आता पक्षाच्या पुढच्या 25 वर्षांची वाटचाल करायची आहे. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आणि संघटना वाढवायची असेल तर काय कामे केली पाहिजेत याची चर्चा मी वारंवार करत असतो”, असं तटकरे म्हणाले.

निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावर काय म्हणाले?

“निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्राच्या विषयावर आम्ही पक्षांतर्गत चर्चा केलेली आहे. तो विषय पूर्णपणाने संपुष्टात आलेला आहे. एकमताने, एक ताकदीने आम्ही सर्वजण काही कालावधीत महाराष्ट्रव्यापी दौरा सुरु करु आणि संघटनेच्या पुनर्बांधणीला वेग देऊ. पुनर्बांधणी शब्द का बोललो तर अजित दादा असेपर्यंत एक बांधणीचा ढाचा ठरलेला होता. दादांच्या दुर्दैवी अकाली निधननंतर सगळीच राजकीय समीकरणं बदलली. प्रशासकीय पातळीवर बदलली, एनडीएमध्ये बदलली, पक्षांतर्गत बदलली, वेगवेगळ्या क्षेत्रात बदलली, कारण एकखांबी नेतृत्वाकडे आम्ही काम करत आलो होतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नाराजीच्या चर्चांवर तटकरे काय म्हणाले?

“अजित दादांच्या निधन नंतर चार दिवसांनी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला. पार्थ पवार राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर काही मंडळींनी गेली दोन महिने आम्हालाच लक्ष्य केलं. जे काही पक्षांतर्गत निर्णय घेतले ते सहमतीने त्या कालावधीत घेतले गेले. पक्षांतर्गत समज-गैरसमज संपुष्टात आले आहेत”, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच “मी नाराज कालही नव्हतो, आजही नाही, उद्याही असण्याचं कारण नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा