Amravati Local Body Constituency: सध्या भाजपचे संख्याबळ सुमारे १५०पर्यंत घटले आहे. त्यामुळे भाजपला विजयासाठी महायुतीतील मित्रपक्षांच्या मतांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागणार आहे.
२०१८च्या निवडणुकीत भाजपकडे अवघी १९९ मते असतानाही प्रवीण पोटे यांनी तब्बल ४५२ मते मिळवत विजय प्राप्त केला होता. काँग्रेसकडे १२८ मते असूनही माधोगडिया यांना केवळ १७ मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी झालेल्या मोठ्या ‘क्रॉस व्होटिंग’ची चर्चा राज्यभर रंगली होती. मात्र, आता परिस्थिती बदललेली आहे. गेल्या आठ वर्षांत राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाल्याने यंदाची निवडणूक भाजपसाठी तितकी सोपी राहणार नसल्याचे चित्र आहे.
Pune MLC: विधान परिषदेच्या पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा; महायुतीत ‘हायव्होल्टेज’ राजकीय घडामोडी
शिवसेनेकडे १८, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३३, तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाकडे २६ मतदार आहेत. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचेही २१ सदस्य असून, त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर ही मते महायुतीच्या बाजूने गृहित धरली जात आहेत. मात्र, उमेदवारीवरून सुरू झालेली अंतर्गत चुरस भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपकडून पुन्हा प्रवीण पोटे यांचे नाव आघाडीवर मानले जात असले, तरी माजी खासदार नवनीत राणा यांनी शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या नावाची चर्चा पुढे आणल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच युवा स्वाभिमानी पक्षाकडून रवी राणा यांचे बंधू सुनील राणा यांच्या नावाचीही चर्चा सुरू असल्याने समीकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
दुसरीकडे, शिवसेना उपनेते तथा माजी विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनीही मतदारसंघात चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी येथील नगर परिषद सदस्यांशी त्यांनी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आणि प्रहार यांच्या एकत्रित मतांमुळे शिवसेनेचे वजन वाढले आहे.
Devendra Fadnavis: पेट्रोल-डिझेलचा राज्यात पुरेसा साठा! मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
काँग्रेस ‘तगड्या’ उमेदवाराच्या शोधात
काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराचे साधे नावही समोर आलेले नाही. तरी पक्षाकडून सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या ताकदवान उमेदवाराच्या शोधाला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत पक्षनिष्ठेपेक्षा उमेदवाराची व्यक्तिगत ताकद आणि राजकीय संपर्क महत्त्वाचे ठरत असल्याचा अनुभव मागील निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे काँग्रेस कुणाला उमेदवारी देते, यावरही निवडणुकीचे पुढील गणित अवलंबून राहणार आहे.
पोटे आणि राणा दाम्पत्यांमधील राजकीय वाद
महायुतीतील या घडामोडींचा परिणाम भाजपच्या निवडणूक रणनीतीवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रवीण पोटे आणि राणा दाम्पत्यातील राजकीय संबंध फारसे सलोख्याचे राहिलेले नसल्याचे बोलले जाते. लोकसभा आणि महापालिका निवडणुकांदरम्यानही काही ठिकाणी भाजप व युवा स्वाभिमानी यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले होते. नवनीत राणा यांनी उघडपणे भाजप उमेदवारांच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप एका गटाने केला होता. त्यामुळेच त्यांना राज्यसभा सदस्यपदाला मुकावे लागल्याचेही बोलले जाते. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याची भूमिका निर्णायक ठरू शकते, असे मानले जात आहे.
पक्षनिहाय संख्याबळ
भाजप : १५०
शिवसेना : १८
राष्ट्रवादी : ३३
युवा स्वाभिमानी : २६
प्रहार जनशक्ती पक्ष : २१
काँग्रेस : १२०
शिवसेना (उबाठा) : २१
राष्ट्रवादी (शप) : ११
समाजवादी पार्टी : २
एमआयएम : १६
वंचित बहुजन आघाडी : ७
बसप : ३
अपक्ष : २५
