• Sun. Sep 20th, 2026

‘लोकसंवाद -२०२६’ कार्यक्रमात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 20, 2026

  • सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांचे आवाहन

रत्नागिरी, दि. २०: सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असला, तरी त्यासोबत सायबर गुन्हेगारीचे मोठे संकटही उभे राहिले आहे. स्मार्टफोन वापरताना नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांनी केले. एका विशेष कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प.पू. बाळसत्याधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र खेडशी येथे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प.पू.बाळ सत्याधारी महाराज, मिरजोळेचे उपसरपंच राहूल पवार, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील, खेडशीचे माजी सरंपच भिकाजी गावडे, उद्योजक अरविंद माने, मुख्याध्यापक सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी ‘लोकसंवाद २०२६’ याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक  श्रीमती सुतार यांनी सायबर गुन्हेगारांच्या विविध क्लृप्त्या उलगडून दाखवल्या. त्या म्हणाल्या, “अनोळखी क्रमांकावरून येणारे मेसेज, संशयास्पद लिंक्स किंवा व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कोणत्याही अनधिकृत गोष्टींवर क्लिक करू नका. एका क्लिकमुळे तुमच्या संपूर्ण मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जाऊ शकतो. बँक खात्यांची माहिती, वैयक्तिक छायाचित्रे आणि आधार कार्डसारखी ओळखपत्रे सायबर गुन्हेगारांच्या हाती लागल्यास त्याचा गैरवापर करून बनावट खाती सुरू केली जातात किंवा आर्थिक फसवणूक केली जाते.”

त्यांनी पुढे डिजिटल अरेस्ट, बनावट पोलीस अधिकारी बनून धमकावणे, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक, गॅस बिल भरण्याचे खोटे मेसेज आणि इन्स्टंट लोन ॲप्सच्या माध्यमातून होणारे ब्लॅकमेलिंग याविषयी रत्नागिरी व परिसरातील घडलेल्या प्रत्यक्ष घटनांची उदाहरणे देऊन माहिती दिली. अशा कोणत्याही धमक्यांना किंवा आमिषांना बळी न पडता कुटुंबीयांशी संवाद साधावा, असा सल्ला त्यांनी दिला.

फसवणूक झाल्यास ‘१९३०’ वर संपर्क साधा

कोणत्याही प्रकारची सायबर किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी अजिबात वेळ न दवडता तत्काळ शासनाच्या १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, जेणेकरून खात्यातून गेलेली रक्कम तत्काळ गोठवून (फ्रीझ करून) वाचवता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाचा वापर करताना सजगता आणि सुरक्षितता बाळगणे हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची गुरुकिल्ली असल्याचे श्रीमती सुतार यांनी अधोरेखित केले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत ४१ अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीची शिफारसपत्रे; पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते वितरण – महासंवाद
नागरिकांच्या सर्वांगीण गरजा पूर्ण करणाऱ्या सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देणे आवश्यक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात; उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed