कर्जत तालुक्यात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली. ड्रम, कॅन आणि कंटेनर घेऊन इंधन साठवण्याची स्पर्धा सुरू झाल्याने काही पंपांवर साठा संपला असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर : कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनचालकांमध्ये मोठी धावपळ उडाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर सोमवारी सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. इंधनपुरवठा खंडित होणार असल्याच्या चर्चांनी अचानक जोर धरल्यानंतर नागरिकांनी दुचाकी, चारचाकींसह थेट ड्रम, कॅन आणि मोठे कंटेनर घेऊन पेट्रोल पंपांवर गर्दी केली. त्यामुळे काही तासांतच अनेक पंपांवरील इंधनसाठा संपला असून काही ठिकाणी ‘पेट्रोल-डिझेल समाप्त’चे फलक लावण्याची वेळ आली.
अफवांमुळे झुंबड
तालुक्यात इंधनटंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांनी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी करण्यास सुरुवात केली. सकाळपासूनच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा वाढत गेल्या आणि दुपारपर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर बनली. काही ठिकाणी वाहनचालकांमध्ये किरकोळ वादावादी झाल्याच्याही घटना घडल्या. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंपचालकांचीही मोठी तारांबळ उडाली.
ड्रम-कॅनमध्ये इंधन साठवण्याकडे कल
अनेक नागरिकांनी भविष्यात इंधन मिळणार नाही या भीतीने प्लास्टिक कॅन, ड्रम आणि मोठ्या कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल भरून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही पेट्रोल पंपांनी मर्यादित प्रमाणात इंधन देण्याचा निर्णय घेतला. तर काही ठिकाणी साठा संपल्याने पंप तात्पुरते बंद ठेवावे लागले. नियमित वाहनचालकांना मात्र तासनतास रांगेत उभे राहूनही इंधनासाठी प्रतीक्षा करावी लागली.
दुसरीकडे अहिल्यानगर शहरात पेट्रोल पुरवठ्यात अचानक ५० टक्क्यांनी कपात झाल्याने काही पेट्रोल पंप तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ आली आहे. पुरेसा साठा नसल्याने अनेक पंपांवर विक्री थांबवण्यात आली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीकडून पुरवठा कमी करण्यात आला असला तरी याबाबत कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आलेली नाही. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम पुरवठ्यावर झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ज्या पंपांवर पेट्रोल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
प्रशासनाकडून टंचाई नसल्याचा दावा
दरम्यान, प्रशासनाकडून अधिकृतरीत्या कोणतीही इंधनटंचाई नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र अफवा आणि भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याकडे वळल्याने परिस्थिती अधिकच बिघडल्याचे दिसून येत आहे. यामुळे सामान्य वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, पुढील काही दिवस पुरवठा सुरळीत राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा