• Sun. Sep 6th, 2026

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त नयना गुंडे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 19, 2026
आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त नयना गुंडे – महासंवाद

अमरावती, दि. १९: पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. पुरग्रस्त, संपर्क तुटणाऱ्या गावांत तसेच आदिवासी क्षेत्रातील दुर्गम गावांत तत्काळ मदत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी सर्व स्तरांवरील संपर्क यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, बचाव पथके 24 तास कार्यान्वित ठेवून जिल्हा प्रशासनाने व संबंधित यंत्रणांनी नेहमी सतर्क राहावे, असे निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिले. आपत्तीच्या प्रसंगावेळी नागरिकांना तत्काळ संपर्क साधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मदत पथकांचे संपर्क क्रमांक सर्व माध्यमांद्वारे जाहीर करावे, असेही त्यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त नयना गुंडे – महासंवाद

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी मान्सूनपूर्व तयारीबाबत जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी (ता.18 मे) आढावा घेतला. यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, कृषी सहसंचालक गणेश घोरपडे प्रत्यक्षरित्या तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांचे प्रमुख दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे म्हणाल्या की, आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्वतयारी व अनुषंगिक उपाययोजना आपापल्या जिल्ह्यात करुन ठेवावी. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने बाधितांसाठी उंच ठिकाणी निवारा, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधींचा साठा आदी मूलभूत सामुग्रींची तजवीज आधीच करून ठेवावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. पावसाळ्यात येणाऱ्या साथ रोगांपासून तसेच विंचू दंश, सर्प दंशापासून बचावासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक आरोग्य केंद्रात इंजेक्शन व पुरेसा औषधीसाठा उपलब्ध करुन द्यावा. अवकाळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने प्रभावी नियोजन करावे. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष 24×7 नेहमी कार्यान्वित ठेवावीत. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करुन बोट, लाईफ जॅकेट, दोरखंड आदी आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावी. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉक ड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात. ‘एल निनो’ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाने कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. आदिवासी दुर्गम गावांतील गरोदर मातांची काळजी घेण्यासाठी जवळपासच्या आरोग्य केंद्रात आवश्यक उपाययोजना करुन ठेवण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या. ब्रिटीशकालीन तलावांच्या नियंत्रणाबाबत जिल्हा परिषद प्रशासन व जलसंधारण विभागाने गाळ काढणे, संरक्षणात्मक बाबींची जाणीवपूर्वक कार्यवाही करावी. ग्रामीण भागात नदी खोलीकरण व पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्याव्यात. महापालिका, नगरपालिका प्रशासनाने संबंधित शहरातील नाल्यांची साफ-सफाई व स्वच्छता, डासांचा प्रतिबंध आदी कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण व शिकस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळा व इमारतींचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी. धरणातील जलसाठ्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे. तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. धरणातील पाणी सोडताना तहसीलदार, पोलीस व कंट्रोल रूमला 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकल्पांची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. दुर्गम भागातील संपर्क न होऊ शकणाऱ्या ठिकाणी बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करावी. हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, विज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हाप्रमुखांनी आताच करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त गुंडे यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी, जिल्ह्यातील मुख्य नद्या व नदीकाठावरील गावे, पूराचा धोका असणारी गावे, हवामानाचा अंदाज वर्तविणारी केंद्र, शोध व बचाव पथके, कुशल मनुष्यबळ, प्रथमोपचार किट, औषधींचा साठा, जिल्हा नियंत्रण कक्ष, पूर नियंत्रण यंत्रणा, प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग, बाधितांसाठी अन्न, भोजन, निवारा, औषधींचा साठा आदी बाबींसंदर्भात श्रीमती गुंडे यांनी सविस्तर आढावा घेतला. तसेच आगामी खरिप हंगामाबाबत व मान्सूनपूर्व तयारी संबंधी कृषी विभागाने केलेले नियोजन याबाबतही त्यांनी आढावा बैठकीत घेतला.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed