ठाणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या वादात आरोप-प्रत्यारोपाच्या मालिका कायम आहेत. भाजपकडूनही शिवसेना नगरसेवकांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. तर भाजप-शिवसेना यांच्यातील वादावरुन महाविकास आघाडीच्या पक्षांनी टीकास्त्र सोडलं आहे. हा वाद इतका वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : ठाणे पालिकेत सत्तेत एकत्र बसलेल्या शिवसेना-भाजप नगरसेवकांच्या महासभेतील वादानंतर सुरु झालेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. भाजपने शिवसेना नगरसेवकांच्या आक्षेपार्ह वर्तनाप्रकरणी निलंबनाची मागणी केली आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नगरसेवकानेही भाजप नगरसेवकांच्या निलंबनाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे केली होती. या वादामध्ये विरोधकांनी उडी घेतली असून या दोन्ही सत्ताधारी पक्षातील वाद हा ‘दिखाव्याची सर्कस’ असल्याचा टोला राष्ट्रवादीने (शप) मारला आहे. तसेच शिवसेनेने (उबाठा) या वादावर टीकास्त्र सोडले असून या पार्श्वभूमीवर सोमवारी ठाणे पालिकेसमोर काँग्रेसने निषेध आंदोलन केले. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला आहे. दुसरीकडे या वादावर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं आहे.
शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमधील वादाच्या दुसऱ्या अंकानंतर सोमवारी शिवसेनेच्या वतीने सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत शहराच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रित काम करावे, अशी भूमिका मांडली. सभागृहात शिवसेनेच्या विरुद्ध घोषणा देणाऱ्या भाजप नगरसेवकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अन्व्ये निलंबन करावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे पत्राद्वारे केली.
दुसरीकडे पालिकेच्या पहिल्या महासभेपासून प्रत्येक महासभेचे ऑनलाईन प्रक्षेपण सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजप आग्रही आहे. मात्र, त्याबाबत महापौरांसह शिवसेनेने अजून निर्णय जाहीर केला नाही. शुक्रवारच्या महासभेत ऑनलाईन प्रक्षेपण सुरू असते, तर ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ फैसला झाला असता, असे भाजपच्या ठाणे पालिका गटनेते मुकेश मोकाशी यांनी सांगितले. महासभेमध्ये भाजपचे नव्हे तर शिवसेनेच्या नगरसेवकांचे वर्तन आक्षेपार्ह असल्यामुळे त्यांना निलंबित करावे, असे प्रत्त्युत्तर मोकाशी यांनी दिले.
‘भाजपने सत्तेबाहेर पडून विरोध करावा’
“शिवसेना-भाजपने निवडणूक एकत्र लढविली आहे. आता ते सत्तेत एकत्र आहेत. तरीही, ज्या पद्धतीने शिवसेनेला विरोध करण्याची भूमिका घेत आहेत; ते पाहता, भाजपकडून सर्कस सुरू करण्यात आलेली आहे. सत्तेत सहभागी होऊन सत्तेलाच आव्हान देण्याची भाजपची कृती कशासाठी आहे, न समजायला जनता दुधखुळी नाही. विरोधक म्हणून आम्ही विषयपत्रिकेवर अभ्यास करून सभागृहात बसत असतो. मात्र, भाजपचे नगरसेवक नाहक वाद निर्माण करून सभागृहाचे कामकाज उधळवून लावत आहेत. त्यांना विरोध करायचाच असेल तर सत्तेबाहेर येऊन आमच्या नेतृत्वाखाली विरोध करावा”, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी भाजप नगरसेवकांनाही दिले.
दरम्यान, याप्रश्नी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आंदोलन केले. शिवसेनेचे (उबाठा) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी महासभेचे कामकाज लाईव्ह कॅमेऱ्यासमोर करण्याची मागणी केली असून टक्केवारीच्या वादातून असे प्रकार होत असल्याचे दिघे यांनी सांगितले.
‘युती म्हणून आम्ही एकत्र’, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप नगरसेवकांची बैठक घेऊन विषय मार्गी लावले जाणार आहेत. काही बाबींवर छोट्या मोठ्या कुरबुरी असतील, तर त्या दूर केल्या जातील, युती म्हणून आम्ही एकत्र आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली.
ठाणे पालिकेतील शिवसेनेच्या नूतनीकृत पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी वादाच्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. दरम्यान, या सोहळ्याला उपमहापौर कृष्णा पाटील आणि भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी हजेरी लावत शिंदे यांचे स्वागत केले. त्यामुळे भविष्यात या वादावर वरिष्ठ पातळीवर पडदा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा