Amruta Fadanvis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर अमृता फडणवीस यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलचा दौरा रद्द केला. खास पैठणी तयार असूनही राष्ट्रहिताला प्राधान्य देत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. दुसरीकडे काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेला विमान प्रवास किंवा बाईकचा वापर यांनी लोकांचे लक्ष वेधले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना तसेच राजकीय नेत्यांना काटकसर करण्याचे आवाहन केले होते. पेट्रोलचा वापर कमी करा, अनावश्यक विमानप्रवास टाळा आणि सोने खरेदी टाळा, असे आवाहन त्यांनी केले होते. देशाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कान्स चित्रपट महोत्सवातील आपला नियोजित दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचा मान राखत अनावश्यक विमानप्रवास टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून स्पष्ट केले.
कान्स चित्रपट महोत्सव काय आहे?
फ्रान्समधील निसर्गरम्य ‘कान्स’ शहरात दरवर्षी होणाऱ्या या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात जगभरातील सेलिब्रिटी सहभागी होतात. रेड कार्पेटवरील ग्लॅमरस फॅशन आणि कलाकारांचे लूक नेहमीच चर्चेत असतात. यंदा भारतातून आलिया भट्ट, उर्वशी रौतेला, कल्याणी प्रियदर्शन यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले आहेत.
महिनाभरापासून सुरु होती तयारी
विशेष म्हणजे, या सोहळ्यासाठी येवला येथील कारागिरांनी महिनाभर मेहनत घेऊन खास पैठणी तयार केली होती. या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व अमृता फडणवीस करणार होत्या. मात्र, राष्ट्रहिताला प्राधान्य देत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “महाराष्ट्राची संस्कृती आणि गौरवशाली हातमाग वारशाचे कान्स चित्रपट महोत्सवात प्रतिनिधित्व करण्याचे निमंत्रण मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवास मर्यादित ठेवण्याच्या आणि काटकसर अंगीकारण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाचा आदर करत मी माझा कान्स दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रवासासाठी घेतलेली मेहनत, कारागिरांचे कष्ट आणि कलात्मकता पाहता हा निर्णय सोपा नव्हता. पण देशाचा प्रश्न येतो तेव्हा आपण नेहमी देशासोबत ठामपणे उभे राहिले पाहिजे. रेड कार्पेटची वाट पाहता येईल; पण देश नेहमी प्रथम आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वेधलं लक्ष
दरम्यान, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परवा १५ मे रोजी पुण्याहून बंगळुरूकडे विशेष विमानाऐवजी इंडिगोच्या नियमित प्रवासी विमानाने प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी सामान्य प्रवाशांसोबत विमान प्रवास करत साधेपणाचा संदेश दिला. याशिवाय त्यांनी बाइकने विधानभवन गाठले होते. यातून त्यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणारी कृती केली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा