Maharashtra Weather Forecast and Monsoon Update : आयएमडीचा 16 मेसाठीचा ताजा अंदाज जाहीर झाला आहे. त्याशिवाय आज रोजी मान्सूनबद्दलही मोठी माहिती समोर आली आहे.
16 मे रोजी राज्यामध्ये हवामान कसे राहणार?
हवामान खात्याने शनिवारी (16 मे 2026) साठीचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर कोकण-गोवा भागात उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस, तसेच ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईत हवामान कसे राहिल?
मुंबईत सकाळी अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून उष्ण आणि दमट हवामानाचा त्रास जाणवू शकतो. शहरातील कमाल तापमान 35 अंश तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Mumbai-Hyderabad Bullet Train: अवघ्या 50 मिनिटांत पुणे! मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग निश्चित, पंढरपूर-सोलापूरला होणार मोठा फायदा
पुढील काही दिवस महत्त्वाचे
राज्यातील तापमानात पुढील काही दिवस चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चार दिवसांत महाराष्ट्रातील कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होईल. त्यानंतर तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. तर काही भागात किमान तापमानातही किरकोळ वाढ होण्याचा अंदाज आहे.
बळीराजासह शहरी नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका
दरम्यान, राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. अकोला येथे सर्वाधिक 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा 45.5, जळगाव 45.3, अमरावती 45.2, नागपूर 44, परभणी 43.9 आणि यवतमाळ येथे 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गाला उष्णतेचा मोठा फटका बसत आहे.
मान्सूनबाबत मोठी अपडेट
दरम्यान, यंदाच्या मान्सूनबाबत हवामान विभागाने मोठा अंदाज व्यक्त केला आहे. केरळमध्ये नैऋत्य मान्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार, 26 मे 2026 रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो. मात्र, या तारखेत चार दिवसांचा फरक असू शकतो. त्यामुळे 22 मे ते 30 मे दरम्यान कधीही मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.
यंदा किती पाऊस?
साधारणपणे केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची अधिकृत तारीख १ जून मानली जाते. मात्र, यंदा वातावरणीय परिस्थिती अनुकूल असल्याने मान्सून वेळेपूर्वीच सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरात मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान तयार होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, यंदाच्या पावसाबाबतही हवामान विभागाने प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. देशात सरासरीच्या तुलनेत 92 टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
