• Fri. Sep 18th, 2026

Chhatrapati Sambhajinagar: झाडाचा आसरा बेतला जिवावर! पिशोर परिसरात वीज कोसळून एकाच कुटुंबातील ३ महिलांचा दुर्दैवी अंत; ३ जण गंभीर

Rain News: एकाच कुटुंबातील तीन महिलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पावसाचा आसरा घेतला अन् काळाने घाला घातला! वीज कोसळून पती-पत्नीचा दुर्दैवी अंत; मुलगा जखमी(फोटोLipi)
​छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड तालुक्यातील पिशोर जवळील वाघुळखेडा शिवारात गुरुवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने भयंकर थरार घडवून आणला. शेतात काम आटोपून घराकडे परतत असताना पावसापासून बचावासाठी कवठाच्या झाडाचा आसरा घेणे सय्यद कुटुंबाच्या अंगाशी आले आहे. अचानक कोसळलेल्या महाकाय विजेमुळे एकाच कुटुंबातील ३ महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य २ महिलांसह एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेने पिशोर परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

​या भीषण दुर्घटनेत फरजाना हमीद सय्यद (वय ३८), तस्लिम मुक्तार सय्यद (वय ५०) आणि १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी अलविरा हनिफ सय्यद यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. पिशोर परिसरातील वाघुळखेडा शिवारातील गट क्रमांक ७१ मध्ये सय्यद कुटुंबातील महिला अन् सदस्य शेतात काम करत होते. गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले अन् विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस वाढल्याने बचावासाठी हे सर्वजण जवळच असलेल्या एका कवठाच्या झाडाखाली जाऊन थांबले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्याच झाडावर प्रचंड आवाजासह थेट वीज कोसळली.

​३ जण गंभीर; ‘घाटी’ रुग्णालयात उपचार सुरू…

या दुर्घटनेत हाफिज खलील सय्यद (वय २५), अनिसा निसार सय्यद (वय ३५) आणि हमीदा सय्यद हमीद (वय ३२) हे तिघे विजेच्या तीव्र झटक्याने गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेने पिशोर ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्टरांनी ३ महिलांना मृत घोषित केले, तर गंभीर जखमी असलेल्या तिघांवर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार दत्तू लोखंडे, दत्तात्रय मोरे, कौतिक सपकाळ आणि विजय भोटकर यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणी पिशोर पोलिसांत अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार सारिका भगत यांनी पिशोर येथे पोहोचून मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा