• Fri. Jul 3rd, 2026

    समाजाधारित शिक्षण परंपरा भारतीय शिक्षणव्यवस्थेची ताकद – स्मृती इराणी – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 15, 2026
    समाजाधारित शिक्षण परंपरा भारतीय शिक्षणव्यवस्थेची ताकद – स्मृती इराणी – महासंवाद

    • शिक्षण सुधारणा, महिला शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर शासकीय विधि महाविद्यालयात संवाद
    • इंग्लंडचे माजी शालेय शिक्षण मंत्री सर निक गिब यांच्यासह मान्यवरांचा सहभाग

    मुंबई, दि. १५ : भारतीय शिक्षणपद्धती ही केवळ शाळांपुरती मर्यादित नसून घर, कुटुंब आणि सामाजिक अनुभव यामधूनही मुलांचे शिक्षण घडण्यास मदत होते. अनुभवांतून कौशल्य विकसित होते, हीच भारतीय शिक्षणसंस्कृतीची खरी ताकद आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री, वर्ल्ड कल्चरल फाउंडेशनच्या सल्लागार तथा अलायन्स फॉर ग्लोबल गुडच्या अध्यक्षा स्मृती इराणी यांनी व्यक्त केले.

    शासकीय विधि महाविद्यालयाच्या सभागृहात सुधारणांपासून अंमलबजावणीपर्यंत : युनायटेड किंगडम आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेतील बदल या विषयावर विशेष शैक्षणिक संवाद सत्र पार झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात इंग्लंडचे माजी शालेय शिक्षण मंत्री सर निक गिब, शिक्षण धोरण तज्ज्ञ मुख्य प्राप्तीकर आयुक्त डॉ. विक्रम सहाय, शासकीय विधि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य उपस्थित होते. अभ्यासक्रम सुधारणा, शिक्षक शिक्षण, शैक्षणिक प्रशासन आणि शिक्षण धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात या संवादात सखोल चर्चा करण्यात आली.

    शिक्षकांचे जीवन आणि जबाबदाऱ्या याबाबत स्मृती इराणी म्हणाल्या की, शिक्षकांचे मूल्यमापन करणे सोपे असले तरी शिक्षक म्हणून आयुष्य जगणे अत्यंत कठीण असते. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता, शिकण्याची गती, महत्त्वाकांक्षा आणि जीवनानुभव वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून त्याच्या क्षमतेनुसार दिशा देणे हे शिक्षकांसमोरील सर्वात मोठे आव्हान असते.

    आदिवासी आणि वंचित समाजघटकांच्या शिक्षणाबाबत त्या म्हणाल्या की, शिक्षण मंत्रालय, आदिवासी विकास मंत्रालय आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक सुविधांमध्ये तूट निर्माण होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

    आंतरराष्ट्रीय क्रमवारी आणि मूल्यमापन पद्धती याबाबत इराणी म्हणाल्या अनेक जागतिक चाचण्या भारतीय सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेत नाहीत. हिमाचल प्रदेशातील विद्यार्थ्याला युरोपीय ब्रँड्सवर आधारित प्रश्न विचारले जातात, अशा पद्धतींमुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे योग्य मूल्यमापन होत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अतिवापरामुळे स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता कमी होवू न देता विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित आणि जबाबदारीने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

    राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करताना लाखो ग्राम शिक्षण परिषदा, पालक-शिक्षक संघटना, विद्यापीठांचे कुलगुरू आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधण्यात आला. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्यांचे अनुभव ऐकूनच प्रभावी आणि दीर्घकालीन शिक्षण सुधारणा घडू शकतात, असे स्मृती इराणी यांनी स्पष्ट केले.

    यावेळी सर निक गिब यांनी त्यांच्या रिफॉर्मिंग लेसन्स या पुस्तकाबाबत माहिती देताना शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा प्रत्यक्ष वर्गखोल्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असण्यावर भर दिला. इंग्लंडमध्ये प्राथमिक शिक्षणात सिंथेटिक फोनिक्स पद्धतीचा अवलंब केल्यानंतर वाचन कौशल्यात मोठी सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गणित शिक्षणात सिंगापूर, हाँगकाँग आणि शांघाय येथील अध्यापन पद्धतींचा समावेश केल्यानंतर विद्यार्थ्यांची कामगिरी उंचावल्याचे त्यांनी नमूद केले.

    डॉ. विक्रम सहाय यांनी शिक्षक प्रशिक्षण, वर्गातील अध्यापन पद्धती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील शिक्षणव्यवस्थेतील बदलांवर भाष्य केले. शिक्षकांची तयारी ही केवळ शैक्षणिक पात्रतेपुरती मर्यादित नसून ती संवेदनशीलता, विषयातील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

    संवादसत्रात उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही मान्यवरांनी दिली. ‘रिफॉर्मिंग लेसन्स’ या सर निक गिब यांच्या, ‘एज्यु्केटिंग एज्युकेटर’ या विक्रम सहाय यांच्या आणि ‘चौकट कायद्याची’ या डॉ. अस्मिता वैद्य यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed