• Tue. Jun 9th, 2026

    कोकणाला जलमार्गे जोडणार! मुरुड-जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी नवी जेट्टी सज्ज; प्रवास सोपा होणार

    कोकणाला जलमार्गे जोडणार! मुरुड-जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी नवी जेट्टी सज्ज; प्रवास सोपा होणार

    Janjira Jetty: कोकण पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जलमार्गे जोडण्यावर भर देण्यात येत असून मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी नव्या जेट्टीचं लोकार्पण करण्यात आलं.

    अमुलकुमार जैन, रायगड: मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज मुरुड जंजिरा किल्ला परिसरातील अत्याधुनिक जेट्टी प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले असून, यामुळे मुरूड-जंजिरा पर्यटनाला नवी ओळख मिळाली आहे. “समुद्र सफर आता अधिक सुरक्षित” या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे उंच लाटा, भरती-ओहोटी आणि खराब हवामानाच्या काळातही पर्यटकांना सुरक्षित बोट प्रवास करता येणार आहे.

    107 कोटींचा खर्च

    महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत साकारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १११.४१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यापैकी ९३.५६ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. सागरमाला योजनेअंतर्गत राज्य हिस्सा निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पर्यावरण विभागाच्या मंजुरीनंतर कामाला वेग देण्यात आला असून आतापर्यंत सुमारे १०७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.Maharashtra TimesThird Mumbai: ‘मिठागर, खारफुटी, जलस्रोत नष्ट होणार’; तिसरी मुंबई वादाच्या भोवऱ्यात, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    या प्रकल्पाअंतर्गत समुद्रातील प्रचंड लाटांपासून संरक्षण देणारी २५० मीटर लांबीची लाटरोधक भिंत उभारण्यात आली आहे. तसेच आधुनिक पाईल जेट्टी आणि अॅल्युमिनियम गँगवेच्या सहाय्याने पर्यटकांना सुरक्षित चढ-उताराची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेषतः पावसाळा, भरती-ओहोटी आणि खराब हवामानाच्या काळात होणारी अडचण आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
    वार्षिक साडेतीन ते चार लाख पर्यटक मुरूड-जंजिरा किल्ल्याला भेट देतात. या प्रकल्पामुळे पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होणार असल्याने पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. “जंजिरा पर्यटनाला सुवर्णस्पर्श” देणारा हा प्रकल्प रायगडच्या पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

    काय-काय सुविधा असतील?

    पर्यटनासोबतच मत्स्यव्यवसायालाही या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. मच्छिमारांसाठी सुरक्षित बंदर, नौकानयन मार्ग, बोट पार्किंग आणि वाहन पार्किंग सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. याशिवाय मासळी लिलाव गृह, जाळी विणण्याचे शेड, विश्रामगृह, रेडिओ कम्युनिकेशन सेंटर आणि स्वच्छतागृहांची उभारणीही करण्यात आली आहे. डांबरी रस्ते, काँक्रीटीकरण, विद्युतीकरण, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, पाण्याची टाकी आणि पंपहाऊस या मूलभूत सुविधा देखील प्रकल्पात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुरूड परिसरातील स्थानिक अर्थकारणाला चालना मिळून रोजगारनिर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

    Maharashtra TimesNavi Mumbai News: ऐरोली-काटई नाका मार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण, शिळफाट्यावरील वाहतूककोंडी फुटणार; ठाणे-नवी मुंबई प्रवासात वेळ वाचणार

    मे. डी.व्ही.पी. फॉरकॉन (JV) या कंपनीला प्रकल्पाचा कार्यादेश देण्यात आला असून प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. “अरबी समुद्रात विकासाची नवी वाट” ठरणारा हा प्रकल्प मुरूड-जंजिरा किल्ल्याच्या पर्यटनाला आधुनिक आणि सुरक्षित स्वरूप देणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा