• Wed. Jun 17th, 2026

    न्हावरा फाटा ते जामखेड रस्ता (एनएच- ५४८ डी) दर्जेदार करा – सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 13, 2026
    न्हावरा फाटा ते जामखेड रस्ता (एनएच- ५४८ डी) दर्जेदार करा – सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : न्हावरा फाटा ते जामखेड रस्त्याचे (एनएच-548 डी) काम दर्जेदार झाले नसून रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात, जीवितहानी होत आहे. 2019 साली सुरु झालेले काम अद्याप अपूर्ण असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यासंदर्भात सचिव (राष्ट्रीय महामार्ग), सा.बां.विभाग यांनी आठ दिवसाच्या आत तेथे प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुनिष्ठ पाहणी अहवाल सादर करावा. नियमानुसार दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे जामखेड शहरातील ज्या भागातून हा रस्ता जातो तेथील अतिक्रमणे हटवून रस्त्याचे काम पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने दक्षता घ्यावी, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

    विधानभवन येथे न्हावरा फाटा ते जामखेड रस्ता तसेच जामखेड शहरातील रस्त्याबाबत महत्वाची बैठक पार पडली.

    यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, अधीक्षक अभियंता तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता संजय शेवाळे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

    बैठकीत न्हावरा फाटा ते अढळगाव रस्ता कामाची अपूर्णता, रस्त्याला गेलेले तडे, परिणामस्वरुप होणारे अपघात, लगतच्या शेतकऱ्यांकडून मुरुम उचलणे आणि त्याचा मोबदला न देणे यासंदर्भातील वस्तूस्थितीदर्शक छायाचित्रे आणि व्हिडीओच सभापती महोदयांनी सादर केले आणि निधीचा अपव्यय, नागरिकांची गैरसोय, अपघात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वत: सचिव (राष्ट्रीय महामार्ग) यांनी आठ दिवसाच्या आत प्रत्यक्ष भेट देऊन रस्ता कामाची पाहणी करावी, हा रस्ता वाहतूक योग्य होईल यादृष्टीने तातडीने सर्व उपाययोजनांची पूर्तता करावी आणि विलंब, निकृष्ट काम याबाबत दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश दिले.

    त्याचप्रमाणे जामखेड शहरात ज्या भागातून हा महामार्ग जातो तेथील अतिक्रमणे हटवून रस्ता काम पूर्ण करण्यात येऊन रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात यावा, येत्या पावसाळ्यात नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यात यावी, नगरपरिषद प्रशासन, महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस यंत्रणा, कंत्राटदार या सर्व यंत्रणांनी तातडीने समन्वय प्रस्थापित करुन 31 मे च्या आत अतिक्रमणासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, असेही या बैठकीत सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

    ०००

    मोहिनी राणे/स.सं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed