• Tue. Sep 8th, 2026

मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठी मोहीम; तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ   – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 12, 2026
मुलांच्या निरोगी भविष्यासाठी मोठी मोहीम; तंबाखूमुक्त शाळांना राष्ट्रीय पाठबळ   – महासंवाद

मुंबई, दि. १२ : देशभरात तंबाखूमुक्त समाज निर्माण करणे आणि मुलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाच्या सहकार्याने ‘तंबाखूमुक्त आणि निरोगी बालक – इंडिया व्हिजन’ या अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत नरोटम सेखसरिया फाउंडेशन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘नरोटम सेखसरिया फाउंडेशन ग्रँट्स अँड अवॉर्ड्स २०२६’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी महाराष्ट्र, राजस्थान आणि इतर राज्यांतील सहा सामाजिक परिवर्तनकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये अमोल रामभाऊ काले, डॉ. जगदीशचंद्र बी. वाठार, कमलेश कुमार टेटरवाल, नरेंद्र बालू पाटील, रवि बालाजीराव धागे आणि डॉ. श्वेता सौरभ खांडरे यांचा समावेश होता.

आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय मोहिमेची सुरुवात २००८ मध्ये झाली. आतापर्यंत या अभियानांतर्गत ३९ स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) सहाय्य देण्यात आले असून सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६० व्यक्तींना गौरविण्यात आले आहे. संस्थेच्या माहितीनुसार, या मोहिमेच्या माध्यमातून देशातील १३ राज्यांमधील सुमारे १५ लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आले असून ५,५०० हून अधिक शाळांना तंबाखूमुक्त घोषित करण्यात आले आहे.

तसेच ‘टोबॅको-फ्री स्कूल प्रोग्राम २०२६–२७’ अंतर्गत चार संस्थांना अनुदान देण्यात आले. त्यामध्ये बालाजी सेवा संस्थान, जनलोक कल्याण परिषद, धरती ग्रामोथान एवं सहभागी ग्रामीण विकास समिति आणि ग्रामीण स्वावलंबन समिति यांचा समावेश होता.

कार्यक्रमादरम्यान तंबाखूमुळे होणारे आजार, विशेषतः कर्करोगाचा वाढता धोका आणि लहान वयातच जनजागृतीचे महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी एनएसएफतर्फे राबविण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमांवर आधारित एक विशेष लघुपटही प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमास नरोटम सेखसरिया फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष जोशी, उपाध्यक्ष राजश्री कदम, सहाय्यक संचालक रीटा पावडे, तसेच गौरव अरोरा, दत्ता बालासाहेब आणि शिरीन भूटिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने विविध राज्यांतील स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी आयोजकांनी देशभरात तंबाखूमुक्त जनजागृती मोहीम अधिक व्यापक करण्याचा तसेच शाळा आणि समुदायांमध्ये आरोग्य शिक्षण अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात निरोगी आणि तंबाखूमुक्त पिढी घडविण्यासाठी हे अभियान सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

०००

श्रध्दा मेश्राम/ वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed