• Thu. Aug 6th, 2026

    भारत विश्वगुरू होण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे – यशदाचे प्रभाकर वर्तक – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 7, 2026
    भारत विश्वगुरू होण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे – यशदाचे प्रभाकर वर्तक – महासंवाद

    मुंबई, दि. ७ : भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती नव्हे तर नैतिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सामाजिक प्रगती आवश्यक आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी हे राष्ट्रनिर्मितीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, अशा अधिकाऱ्यांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन यशदाचे प्रशिक्षक प्रभाकर वर्तक यांनी केले.

    मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक वारी 2.0-महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘इथिक्स इन गर्व्हनन्स’ या विषयावर वर्तक बोलत होते. यावेळी सहसचिव बडगेरी यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

    वर्तक यांनी सांगितले की, समाजात प्रेम, बंधुता, नैतिकता, विश्वकल्याणाला फार महत्व आहे. याचा समाजामध्ये, प्रशासनात योग्य वापर केला तर समाजाचे कल्याण होते. मागील वर्षी भारत देश विश्वगुरू होण्याच्या वाटेवर होता. यासाठी प्रशासनात सक्षम, प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेले अधिकाऱ्यांचे योगदान देशाच्या विकासाला गती देतात. पायाभूत सुविधा, आर्थिक विकासामध्ये महाराष्ट्र राज्य देशातील सर्वोत्तम राज्य याच अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक आणि नैतिक कामामुळे झाले आहे. प्रशासनात पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाला खूप महत्व आहे. भ्रष्टाचार हा विकासातील अडथळा असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास जनतेचा शासनावर विश्वास वाढतो आणि विकास कामांना गती मिळते. दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे व सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हे अधिकाऱ्यांचे मोठे कर्तव्य आहे. कायद्याच्या चौकटीत राहून सामाजिक भावनेतून पिडीत, शोषितांना लाभ पोहोचविण्याचे कर्तव्य अधिकाऱ्यांनी पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.

    सामाजिक न्याय आणि समानतेचा वापर करा, दुसऱ्याची सुश्रुषा करा या बुद्धांच्या तत्वाची सद्यस्थितीत आवश्यकता आहे. अंतर्मनाचा आवाज ऐकून मनावर ताबा मिळवा. धर्म आणि निती याबाबत विविध धर्मात चांगली शिकवण दिली आहे. संतांचे विचार, आचरण या माध्यमातून समाजात वागण्याबाबतची माहिती त्यांनी दिली.

    प्रशासनात काम करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नैतिक मूल्ये, तत्त्वे आणि योग्य आचारसंहिता पाळणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकता, जबाबदारी, निष्पक्षता, लोकहित, शिस्त आणि सेवाभाव, कायद्याचे पालन योग्यरित्या केल्यास सामान्य नागरिकांच्या कामामध्ये अडथळे येणार नाहीत. यातून राज्याचा विकास शक्य आहे. प्रत्येकांनी आपापली जबाबदारी पार पाडावी, लाच घेवू नका. संपूर्ण व्यवस्था भ्रष्ट नाही, अनेक अधिकारी लाच न घेता पात्र व्यक्तीला शासकीय योजना मिळवून देतो, हे प्रशासनातील महत्वाचे इथिक्स आहे. असे अधिकारी वाढविणे आवश्यक झाले असून यामुळे जनतेचा प्रशासनावर विश्वास वाढतो, भ्रष्टाचार कमी होवून चांगले व पारदर्शक शासन निर्माण होते, असे वर्तक यांनी सांगितले.

    वर्तक यांनी प्रशासनातील चांगल्या कामाबाबत विविध उदाहरणे देत माहिती दिली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संतांची, कवींची कोणती मूल्य स्वीकारावी, याबाबतही सांगितले.

     

     

     

     

     

    0000

    धोंडिराम अर्जून/स.सं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed