• Thu. Jul 2nd, 2026

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 7, 2026
    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    मुंबई, दि. ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था, नवोपक्रम आणि उद्योजकतेचा नवा वेग’ या विषयावर आधारित या विशेष मुलाखतीत राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टीमची वाटचाल, नव्या संधी, शासनाच्या धोरणात्मक उपक्रमांसह उद्योजकतेला मिळणारे बळ यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत १२ ते १६ मे, २०२६ या कालावधीत रोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप पॉलिसी २०२४-२९ अंतर्गत राज्यात निर्माण होत असलेल्या नवोपक्रमशील वातावरणाचा आढावा या मुलाखतीत घेण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डीप टेक, क्लायमेट टेक, ईव्ही, अॅग्रीटेक यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांसाठी उपलब्ध होत असलेल्या संधींबाबत डॉ. पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ग्रामीण भागात स्टार्टअप संस्कृती रुजविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, महिला आणि युवा उद्योजकांसाठीच्या विशेष योजना तसेच कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीमध्ये स्टार्टअप्सची भूमिका यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.

    स्टार्टअप्सना कल्पनेपासून बाजारपेठेपर्यंतचा प्रवास करताना येणारी आव्हाने, ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ अंतर्गत मिळणारे प्रोत्साहन, नियामक सहाय्य, जागतिक बाजारपेठेतील संधी, तसेच कॉर्पोरेट आणि स्टार्टअप्स यांच्यातील सहयोगाचे महत्त्व याबाबतही डॉ. पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे स्टार्टअप हब बनविण्यासाठी शासनाने आखलेला रोडमॅप, ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्सना दिले जाणारे प्राधान्य, तसेच आगामी काळातील धोरणात्मक बदल याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती या मुलाखतीतून श्रोत्यांना मिळणार आहे.

    0000

    जयश्री कोल्हे/स.सं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed