• Mon. Jun 15th, 2026

    Mumbai News: मुंबईतील 70 वर्षे जुनी चाळ जमीनदोस्त होणार, निरोप घेताना रहिवाशांचे डोळे पाणावले; शिवडी-वरळी उन्नत मार्गाचा मार्ग मोकळा

    Mumbai News: मुंबईतील 70 वर्षे जुनी चाळ जमीनदोस्त होणार, निरोप घेताना रहिवाशांचे डोळे पाणावले; शिवडी-वरळी उन्नत मार्गाचा मार्ग मोकळा

    Worli-Sewri Connector: प्रभादेवी येथील हाजी नूरानी चाळ रिकामी करण्याच्या अंतिम टप्प्याला सुरुवात झाली असून एल्फिन्स्टन पूल परिसराजवळील ४.५ किमी डबल डेकर शिवडी-वरळी एलिव्हेटेड कॉरिडोर प्रकल्पातील शेवटचा मोठा अडथळा दूर झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, मुंबई: प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेरील सुमारे ६० ते ७० वर्षे जुनी हाजी नुरानी चाळ अखेर रिकामी होण्याच्या टप्प्यावर पोहोचली असून शिवडी-वरळी उन्नत मार्गाचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूण २३ घरे आणि ९ दुकाने असलेल्या या चाळीतून बहुसंख्य रहिवाशांनी मंगळवारी, तर अनेकांनी बुधवारी स्थलांतर करत आपले संसार हलवले. सर्व पात्र रहिवाशांना पर्यायी घरे मिळाल्याने ही प्रक्रिया तुलनेने सुरळीत पार पडल्याचे चित्र होते.

    आठवणींचा पूर डोळ्यांत दाटून आला

    गेले दोन दिवस या परिसरात स्थलांतराची लगबग दिसून आली. घरातील सामानाची बांधाबांध, ट्रॉली व छोट्या वाहनांमधून हलवल्या जाणाऱ्या वस्तू, तर काही दुकानदारांकडून फर्निचर आणि साहित्य तोडून स्क्रॅपमध्ये विकण्यासाठी सुरू असलेली लगबग या सगळ्यामुळे चाळीचा शेवट जवळ आल्याची जाणीव होत होती. अनेक कुटुंबांसाठी हा भावनिक क्षण ठरला. वर्षानुवर्षे राहिलेल्या घरांना निरोप देताना आठवणींचा पूर डोळ्यांत दाटून येत होता. “माझा जन्म या चाळीत झाला. माझे वडीलही इथेच राहत होते. इतकी वर्षे इथे काढल्यानंतर घर सोडताना आम्ही भावनावश झालो आहोत”, असे ५७ वर्षीय विलास गुरव यांनी सांगितले. अशा अनेक रहिवाशांसाठी ही चाळ केवळ वास्तू नव्हती, तर आयुष्याचा अविभाज्य भाग झाली होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) महत्त्वाच्या टप्प्यासाठी या जागेवर उन्नत मार्गाचा खांब उभारला जाणार आहे. प्रभादेवी स्थानकाजवळील लक्ष्मी सदन या दुसऱ्या इमारतीचे पाडकाम मार्चमध्ये सुरू झाले होते. या दोन्ही इमारतींमुळे गेल्या वर्षभरात प्रकल्पाला मोठा विलंब झाला.

    रहिवाशांच्या विरोधामुळे काही काळ काम ठप्प राहिले होते, तसेच एल्फिन्स्टन रोड उड्डाणपूल बंद करण्याच्या प्रक्रियेलाही विलंब झाला होता. अखेर सप्टेंबर २०२५पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि त्यानंतर प्रशासनाने स्थलांतराची प्रक्रिया गतीने राबवली.

    मेट्रो स्थानकात धूर; सेवा विस्कळीत

    मेट्रो-३ मार्गावरील आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-२ स्थानकात बुधवारी दुपारी धूर निघाल्याची घटना घडली. घटनेनंतर मेट्रो प्रशासनाने तत्काळ हालचाल करत परिस्थिती काही मिनिटांत नियंत्रणात आणली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संबंधित स्थानकावर गाड्या थांबविण्यात आल्या आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

    सावधगिरीचा उपाय म्हणून स्थानक काही काळासाठी रिकामे करण्यात आले होते. या घटनेमुळे सहार रोड ते आरे दरम्यानची मेट्रो सेवा तात्पुरती विस्कळीत झाली होती. मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सेवा पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमींची नोंद नाही. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा