• Fri. Jun 19th, 2026

    येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 5, 2026
    येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    मुंबई, दि. ५ – इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासाठीच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

    शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक डॉ.हेमंत वसेकर, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांच्यासह सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते.

    शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून दुसरी, तिसरी आणि चौथीसोबतच सहावीचाही नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार  काठिण्यपातळी निश्चित करुन अध्ययन निश्पत्तीवर आधारित अभ्यासक्रम आराखडा ठरविण्यात आला आहे. यास राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यानंतर या प्रारूपाला शालेय शिक्षण आयुक्तांकडे असलेल्या अभ्यासक्रम समन्वय समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यासाठीची पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तातडीने तयार करून ती येत्या शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीपर्यंत उपलब्ध करुन दिली जातील.

    दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रम आराखडे आणि त्यासाठीच्या पाठ्यपुस्तकांवरील शिकवणी आदींसाठी एससीईआरटीतर्फे राज्यातील मुख्य प्रशिक्षण याच महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. त्यांनतर जिल्हास्तरावरील शिक्षकांचे प्रशिक्षण असे प्रशिक्षणाचे टप्पे पूर्ण केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

    ०००००

    बी.सी.झंवर/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed