• Fri. Aug 7th, 2026

    विलेपार्ले स्टेशनजवळ इलेक्ट्रिक कारची धडक, भाजी खरेदीला आलेल्या विवाहितेचा अंत, 11 वर्षांचा लेक मायेला मुकला

    विलेपार्ले स्टेशनजवळ इलेक्ट्रिक कारची धडक, भाजी खरेदीला आलेल्या विवाहितेचा अंत, 11 वर्षांचा लेक मायेला मुकला

    Vile Parle Crash : गृहिणी असलेल्या किंजल शाह भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्या असताना विले पार्ले स्थानकाबाहेर ही दुर्घटना घडली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : विलेपार्ले (पूर्व) परिसरातील मोगीबाई मार्केटजवळ कारवरील नियंत्रण सुटून ती पादचाऱ्यांवर धडकल्याने ४१ वर्षीय किंजल शाह यांचा मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेमुळे किंजल यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना या धक्क्यातून सावरणे कठीण जात आहे. गृहिणी असलेल्या किंजल शाह भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्या असताना ही दुर्घटना घडली. रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

    वर्षभरापूर्वीच नव्या घरी

    किंजल शाह या गृहिणी होत्या. त्यांचे पती हिरेन शाह यांचा प्लास्टिकच्या वस्तूंचा व्यवसाय आहे. त्यांना ११ वर्षांचा परम नामक मुलगा आहे. जैन धार्मिक आचरणांचे पालन करणाऱ्या किंजल नित्यनेमाने बाहेर पडल्या होत्या. विलेपार्ले भागातील स्टेशन रोड परिसरात जिथे हा अपघात झाला, तिथे अलिकडेच त्या राहण्यास आलेल्या होत्या.

    इलेक्ट्रिक कारची जोरदार धडक

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलेपार्ले पूर्व येथील मोगीबाई मार्केटजवळ मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की ४४ वर्षीय विलास श्रीधर गव्हाणकर चालवत असलेल्या इलेक्ट्रिक कारवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने ती वर्दळीच्या रस्त्यावर चालणाऱ्या अनेक पादचाऱ्यांना धडकली.

    Girish Mahajan | भाजपवर फोडाफोडीचा आरोप, ‘राऊतांमुळे ठाकरे सेना शिल्लक राहणार नाही’,महाजनांचा प्रहार

    अपघाताचे कारण अस्पष्ट

    किंजल शाह यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या अपघातात इतर तीन ते चार जणही जखमी झाल्याचे वृत्त आहे. चालकाची चूक की वाहनातील एखादा बिघाड, यामुळे हा अपघात झाला असावा, याचा पोलीस तपास करत आहेत.
    Maharashtra TimesPune News : लग्नासाठी 14 कोटींचा महाल बूक, पण त्याआधीच आक्रित; होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर ट्रेकिंग, पुण्यातील तरुणाचा वेदनादायी शेवट

    मैत्रिणींना शोक अनावर

    “किंजल माझी जिवाभावाची मैत्रीण होती. ती अनेक वर्षांपासून आमच्या सोसायटीत राहत होती. साधारण वर्षभरापूर्वी ती एका नवीन ठिकाणी राहायला गेली होती. किंजल आता आपल्यात नाही, या गोष्टीवर मला आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना विश्वासच बसत नाहीये.” अशा भावना किंजल यांच्या मैत्रिणीने व्यक्त केल्याचं वृत्त ‘मिड डे’ वेबसाईटने दिलं आहे.

    कुटुंबीय मानसिक धक्क्यात

    “किंजल अत्यंत प्रेमळ स्वभावाची होती. ती दररोज जैन धर्मातील धार्मिक विधींचे काटेकोरपणे पालन करायची. ती नेहमीच आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करायची. तिच्या अकाली निधनावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. तिचे कुटुंब सध्या प्रचंड मानसिक धक्क्यात आहे.” अशा भावनाही मैत्रिणीने बोलून दाखवल्या.
    Maharashtra TimesRomanch Mahajan : घोडागाडीतून आई पडली, 18 वर्षांच्या लेकाचा जीव घाबरा, आईला वाचवण्याच्या नादात तरुणाने जीव गमावला, महाजन कुटुंबावर शोककळा
    मानवी चुकीमुळे अपघात झाला की वाहनात काही यांत्रिक बिघाड होता, धडक होण्यापूर्वीचा वाहनाचा वेग किती होता, प्रत्यक्षदर्शी आणि जखमी व्यक्तींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा