Aditya Mangal Nagpur HSC Success Story : नागपूरच्या नरखेडमधील दृष्टिहीन विद्यार्थी आदित्य मंगल याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत १२वी परिक्षेत ८४ टक्के गुण मिळवले आहेत. शेतकरी कुटुंबातील या तरुणाचा संघर्ष आणि यशाचा संपूर्ण प्रवास खूप प्रेरणादायी आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : म्हणतात ना, “पाखरांच्या पंखात बळ असलं की क्षितीजही ठेंगणं वाटतं.” नागपूरच्या आदित्य मंगलने हे केवळ ऐकून सोडून दिलं नाही, तर ते सत्यात उतरवून दाखवलं आहे. डोळ्यांत नियतीने कायमचा अंधार दिला असला, तरी त्याने आपल्या अंतर्मनातील प्रकाशाच्या जोरावर यशाचं असं एक शिखर सर केलंय, ज्यासमोर शारीरिक मर्यादाही थिट्या पडल्या आहेत. प्रतिकूल परिस्थिती, घरची बेताची आर्थिक ओढतण आणि रोजचा संघर्षाचा प्रवास… या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करत आदित्यने १२ वीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नियतीला आव्हान देत, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या जिद्दी तरुणाचा प्रवास केवळ एका विद्यार्थ्याचा निकाल नाही, तर संकटांवर मात करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे.
शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात आदित्यने कला शाखेत हे यश मिळवले. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेणारा आदित्य हा एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेला आहे. वडील शेतकरी तर आई गृहिणी, अशा मर्यादित साधनसंपत्तीत वाढलेल्या आदित्यने प्रतिकूल परिस्थितीला कधीही आपल्या मार्गात अडथळा होऊ दिला नाही.
“माझ्या डोळ्यांना दिसत नाही, पण…”
आदित्य दृष्टिहीन असला तरी त्याच्या स्वप्नांना कधीच अंधार पडला नाही. नागपूरमधील समाजकल्याण वसतिगृहात राहून तो दररोज सिटी बसने कॉलेजला जात असे. हा प्रवास केवळ अंतराचा नव्हता, तर संघर्षाचा आणि आत्मविश्वासाचा होता. रोजच्या या कष्टमय दिनक्रमातही त्याने अभ्यासात सातत्य ठेवले आणि स्वतःच्या मर्यादांवर मात करत यशाचे शिखर गाठले. “माझ्या डोळ्यांना दिसत नाही, पण माझ्या मनाला माझं लक्ष्य स्पष्ट दिसतं,” असे सांगणाऱ्या आदित्यने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, मित्र आणि कुटुंबीयांना दिले आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे स्वप्न साकार झाल्याचे तो नम्रपणे सांगतो.
अधिकारी बनण्याचा निर्धार
आजच्या काळात अनेक विद्यार्थी छोट्या अडचणींमुळे खचून जातात, पण आदित्यची कहाणी त्यांना नवसंजीवनी देणारी आहे. आर्थिक अडचणी, शारीरिक मर्यादा आणि सामाजिक अडथळे यांवर मात करून त्याने मिळवलेले हे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. आदित्यचे स्वप्न इथेच थांबत नाही. पुढे एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचा त्याचा निर्धार आहे. “मला समाजासाठी काम करायचं आहे, लोकांच्या अडचणी सोडवायच्या आहेत,” असे तो ठामपणे सांगतो. अंधारातही उजेड शोधणाऱ्या या जिद्दी युवकाची ही यशोगाथा अनेकांसाठी आशेचा किरण ठरते. डोळ्यांत प्रकाश नसला तरी मनात असलेली जिद्द आणि आत्मविश्वास असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे आदित्यने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा