Nashik MHADA Land Scam News: या गुन्ह्यात नायब तहसीलदाराला अटक झाल्याने इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. पाटील याच्या चौकशीत अनेकांचे ‘बिंग’ फुटण्याची शक्यता असल्याने पोलिस कसून तपास करीत आहेत.
नाशिकमधील म्हाडाच्या जमिनींवरील आरक्षणात झालेल्या बनावटगिरीबाबत दोन महिन्यांपासून नाशिक पोलिस आयुक्तालयाचे विशेष तपास पथक (एसआयटी) तपास करीत आहे. सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने शनिवारी (दि. २) रात्री उशिराने नायब तहसीलदार नितीन पाटील याला ताब्यात घेतले. त्याला रविवारी (दि. ३) नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तपासातील मुद्द्यांच्या आधारे न्यायालयाने पाटील याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात अटक झालेला पाटील हा पहिला प्रशासकीय अधिकारी आहे. तलाठी, तहसीलदार, भूमी अभिलेख या कार्यालयांमधील इतर अधिकारी-कर्मचारीदेखील संशयाच्या भोवऱ्यात असून, पोलिसांनी त्यानुसार पुरावे संकलित केले आहेत.
TCS Company Case : आधी थंड पेय अन् शिरखुर्मातून गुंगीचं औषध दिलं, नंतर पीडितांसोबत संतापजनक कृत्य; नाशिक TCS प्रकरणात SITच्या हाती मोठे पुरावे
या गुन्ह्यात गंगापूर शिवारातील सर्व्हे क्रमांक ७०/१/१ ते ५ या जमिनीच्या प्रकरणात १६ मार्च रोजी दिनेश कन्हैय्यालाल उर्फ सोनू मनवानीला अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीनंतर सशर्त जामिनावर मनवानी काही दिवसांपूर्वीच कारागृहाबाहेर आला, तर २३ एप्रिल रोजी म्हसरूळ शिवारातील सर्व्हे क्रमांक २८७/१ ते ३ या जमिनीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक भगवानदास करमचंदानी याला अटक झाली होती. त्यानंतर आता ३ मे रोजी पाटील याला अटक झाली असून, अजूनही बरेच संशयित अटकपूर्व जामिनासाठी धावधाव करीत आहेत. या प्रकरणात भाजपच्या एका माजी नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे.
Nashik Accident: मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला धडक; अपघातानंतर पळून जाताना पुन्हा अपघात, 3 वर्षीय चिमुकली जखमी
३१ प्रकरणांना मंजुरी
भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन चंद्रकांत काजळे यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे. चार हजार चौरसमीटरपेक्षा जास्त क्षेत्राच्या जमिनीवर गृहप्रकल्प विकसित करताना २० टक्के जागा म्हाडाला परवडणाऱ्या घरांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक होते. मात्र, नाशिकमधील अनेक विकासक आणि जमीन मालकांनी ही तरतूद टाळण्यासाठी जमिनीचे तुकडे करून ते चार हजार चौरसमीटरपेक्षा कमी असल्याचे भासवले. दरम्यान, नायब तहसीलदार नितीन पाटील हा सन २०२२ पासून नाशिकमध्ये नियुक्त आहे. त्याने तलाठी व इतरांवर दबाव आणत संशयित बिल्डर, विकासकांकडे असलेले जमिनीचे बनावट नकाशे मंजूर करण्यास भाग पाडले. त्याने ३१ प्रकरणांना या स्वरूपात मंजुरी दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या कार्यालयातील इतर कागदपत्रांसह सर्व प्रकरणांची पडताळणी पोलिस करीत आहेत.
