• Wed. Jun 17th, 2026
    मला ‘सतरंजी उचले’ म्हणण्यात ज्यांना… विधान परिषदेवर संधी न मिळाल्याने ट्रोल, भाजपच्या केशव उपाध्येंचं टीकाकारांना उत्तर

    Keshav Upadhye on Maharashtra Vidhan Parishad Election : ‘सतरंजी उचल्या’ यासारख्या शब्दात केशव उपाध्ये यांची हेटाळणी केली जाते. त्यामुळे हाच शब्द उचलून धरत त्यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली, भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांची नावं हमखास चर्चेत येतात. त्यापैकी एक म्हणजे भाजप उपाध्यक्ष केशव उपाध्ये . मुख्य प्रवक्तेपद सांभाळलेल्या उपाध्येंना वर्षानुवर्ष विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारीने हुलकावणी दिली आहे. आपल्याला आमदारकीची आस कधीच नव्हती, असं उपाध्ये वारंवार स्पष्ट करत असले, तरी त्यांचे चाहते, समर्थक आणि ट्रोलर त्यांना अनेकदा सोशल मीडियावरुन टोचून बोलतात. अगदी ‘सतरंजी उचल्या’ यासारख्या शब्दात त्यांची हेटाळणीही केली जाते. त्यामुळे हाच शब्द उचलून धरत केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

    केशव उपाध्ये काय म्हणतात?

    की घेतले न हे व्रत अंधतेने…
    २५-३० वर्षांपूर्वी विचारधारेचे काम सुरू करताना कुठे, काय, कोण, कधी होणार याचा कधीही विचार केला नव्हता. प्रखर राष्ट्रवादाची भावना आणि सकारात्मक काम करण्याची जिद्द, यातूनच या प्रवासाला सुरुवात झाली… आणि पाहता पाहता २५-३० वर्षे कधी निघून गेली ते कळलेच नाही.
    Maharashtra TimesBacchu Kadu : बच्चू कडूंची अखेर मोठी घोषणा; शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार, प्रहारची राजकीय दिशाही केली स्पष्ट!
    ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो… अनेक प्रसंग आले आणि मग अशा वेळी अटल बिहारी वाजपेयी नेहमी ज्यांची कविता सांगायचे त्या शिवमंगल सिंह सुमन यांच्या ओळी कायम प्रेरणा देत राहिल्या… “संघर्ष पथ पर जो मिले, यह भी सही… वह भी सही…”
    हीच एका खऱ्या कार्यकर्त्याची भूमिका असते… आणि तीच भूमिका आजही कायम आहे, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

    अमित शाहांसोबत २ बैठका, विवेक कोल्हेंना विधान परिषदेचं गिफ्ट, कार्यकर्त्यांचा जल्लोष गगनात

    सहकाऱ्यांच्या उमेदवारीचा आनंद

    परवा सायंकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले. हे सर्व सहकारीच आहेत. त्यामुळे मनापासून आनंद झाला. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार तसेच संजय भेन्डे आणि विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
    Maharashtra TimesMLC Election NCP Candidate : काँग्रेसकडून निलंबन, ‘मातोश्री’च्या अंगणात पराभव; झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर
    बाकी… मला ट्रोल करण्यात, ‘सतरंजी उचले’ म्हणण्यात ज्यांना आनंद मिळतो, तो त्यांनी जरूर घ्यावा. त्यांनाही मनापासून शुभेच्छा! असा तिरकस टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

    भाजपने प्रादेशिक समतोल साधला

    १३ मे रोजी रिक्त होणाऱ्या नऊ जागांवर संख्याबळानुसार भाजपचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यानुसार भाजपने पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यात, सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विवेक कोल्हे यांचा अपवाद वगळता उर्वरित चार नावं ही पक्षसंघटनेत दीर्घकाळ कार्यरत असलेली आहेत. त्यामुळे यंदा भाजपने पक्ष संघटनेला प्राधान्य देत प्रादेशिक समतोलही साधला आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा