• Mon. Jun 15th, 2026

    महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 29, 2026
    महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम – महासंवाद

    मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शुक्रवार,  १ मे २०२६ रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम याच मैदानावर घेण्यात आली. यावेळी ध्वजवंदन राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव चंद्रकांत मोरे यांनी केले. राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने  ध्वजाला सलामी देण्यात आली.

    शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी गृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    या कार्यक्रमात २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये सशस्त्र दल, नि:शस्त्र दल आणि शालेय पथकास पारितोषिक देण्यात आले. सशस्त्र दलांमध्ये प्रथम पारितोषिक राज्य राखीव पोलीस पथक,  द्वितीय पारितोषिक बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र पुरुष पथक आणि तृतीय पारितोषिक संयुक्तपणे बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याचे सी ६० पथक यांनी पटकाविला. निःशस्त्र दलांमध्ये प्रथम पुरस्कार मुंबई अग्निशमन दल, द्वितीय पुरस्कार सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा,  तृतीय क्रमांक राज्य उत्पादन शुल्क यांनी पटकाविला.

    या संचलनामध्ये शालेय पथके सहभागी झाली होती. शालेय पथकांमध्ये  प्रथम पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुलींच्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर यांच्या पथकास, द्वितीय पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुलांच्या डॉ. ॲन्टोनियो डा सिल्वा हायस्कूल, दादर यांच्या पथकास  आणि तृतीय पुरस्कार रोड सेफ्टी पेट्रोल मुले सेंट पॉल हायस्कूल, दादर यांच्या पथकाने पटकाविला.

    याशिवाय केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या वतीने शासकीय शाळांमधील आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना सशस्त्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम राबविण्यात येत आहे. यामध्ये शासकीय व बृहन्मुंबई महापालिकेच्या २४४ शाळांमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे.२०२५ – २६ या शैक्षणिक वर्षामध्ये पोलीस कॅडेट प्रोग्रॅम अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये  प्रथम पुरस्कार  मराठी मुंबई पब्लिक स्कूल, विलेपार्ले (पश्चिम), द्वितीय पुरस्कार एस.एस.एस मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूल मुंबई आणि तृतीय पुरस्कार  अंजुमन आय इस्लाम बद्रुद्दिन तैयबजी हायस्कूल मुंबई यांनी पटकाविला.

    यानंतर राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, निशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज, गृहरक्षक दल ध्वज), मुंबई लोहमार्ग पोलीस दल, मुंबईत पुरुष पोलीस दल, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल महिला पथक, मुंबई अग्निशमन दल,मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक दल, सुरक्षा सुरक्षा मंडळ दल मुंबई आणि ठाणे जिल्हा, पाईप बँड पथक, बृहन्मुंबई पोलिस महिला पाईप बँड पथक, ब्रास बँड पथक, अश्व दल पोलीस पथक, महिला निर्भया पथक यांनी मानवंदना दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार  यांनी केले.

    00000

    निलेश तायडे/ वि.सं.अ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed