• Sun. Jun 7th, 2026
    Mumbai Water Shortage : ‘अल निनो’चा धसका, 15 मे पासून संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणी कपात, कशी असेल BMCची ही कपात?

    Mumbai Water Cut : धरणांतील पाणीसाठा खालावल्याने मुंबईत १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पालिकेने हा खबरदारीचा निर्णय घेतला असून अश्विनी भिडे यांनी पाणी बचतीचे आवाहन केले आहे.

    अल निनो’चा धसका, 15 मे पासून BMC ने 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला, कशी असेल ही कपात?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: सध्या उन्हाळ्याची सुरुवात आहे. पावसाळा अजून दूर आहे तरीही त्याधीच मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आहे. मुंबई महानगरपालिकेने येत्या १५ मेपासून संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील साठा वेगाने खाली जात असल्याने, यासंदर्भातला निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, पावसाळाही आता अल निनोच्या प्रभावामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

    ‘अल निनो’चा धसका

    यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनला उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मुंबईला पाणाी पुरवणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून केवळ २८ टक्के (४.१६ लाख दशलक्ष लीटर) पाणीसाठा शिल्लक आहे. जर पाणी कपात केली नाही, तर हा साठा केवळ ६ जुलैपर्यंतच पुरेल. मात्र, मान्सूनच्या लहरीपणाचा विचार करता प्रशासनाला हा साठा १७ ऑगस्टपर्यंत पुरवायचा आहे. त्यामुळेच १० टक्के कपातीचा हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत असणार आहे, फक्त सरासरी पुरवठ्यातून थोडा कमी सप्लाय असेल, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    सरकारकडे अतिरिक्त साठ्याची मागणी

    दरम्यान, आता मुंबईची दररोजची पाण्याची गरज ४४६३ दशलक्ष लीटर असताना, सध्या ४००० दशलक्ष लीटर पुरवठा केला जात आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आणि ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे भातसा आणि वैतरणा धरणांतील ‘राखीव साठा’ (Carryover Storage) देण्याची विनंती केली आहे. भातसामधून १४७ एमसीएम आणि वैतरणातून ९० एमसीएम अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे, अशी माहिती आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे.

    Maharashtra TimesMarathi Compulsion : मराठीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत, पण नियम तोडणाऱ्यांवर 1 मे पासूनच कारवाई ; मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

    पाणी बचतीचे आवाहन

    सध्या भातसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा यांसारख्या प्रमुख धरणांतील पाणी पातळी खालावली आहे. २७ एप्रिलच्या आकडेवारीनुसार, धरणांतील एकूण साठा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी अंघोळ, कपडे धुणे आणि इतर घरगुती कामात पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, यासाठी आतापासूनच पाणीबचतीवर भर देणे आवश्यक झाले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा