Vivek Kolhe : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीसाठी अनेक नावे चर्चेत होती. अखेर भाजपकडून आज अधिकृतपणे नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये विवेक कोल्हे या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मोबिन खान, अहिल्यानगर : गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कोपरगावला आता दुसरा आमदार मिळणार आहे. विवेक कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने कोल्हे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. २८ एप्रिल रोजी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली,या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर विवेक कोल्हे यांचे नाव असून, त्यांच्यासोबतच राज्यातील इतर अनुभवी नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. भाजपच्या या निवडीतून आगामी निवडणुकांचे समीकरण आणि अनुभवी व तरुण चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
जाहीर करण्यात आलेल्या यादीत खालील पाच नेत्यांचा समावेश आहे:
१. सुनील विनायक कर्जतकर
२. श्रीमती माधवी नाईक
३. संजय नथुजी भेंडे
४. विवेक कोल्हे
५. प्रमोद शांताराम जठार यांची नावे आहे.
विवेक कोल्हे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळत पक्षश्रेष्ठींच्या विनंतीला मान देऊन निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेचा शब्द देण्यात आला होता. विवेक कोल्हे यांनी सहकार क्षेत्र आणि युवकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे काम केले आहे. विशेषतः नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता, पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे उत्तर नगर जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पाचही जागांसाठी लवकरच मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. भाजपच्या या ‘फाइव्ह स्टार’ फळीमुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, आता सर्वांचे लक्ष प्रत्यक्ष निवडणूक आणि निकालानंतरच्या राजकीय घडामोडींकडे लागले आहे.
कोण आहेत विवेक कोल्हे?
जून २०२३ मध्ये राहता तालुक्यातील गणेश नगर कारखान्याची निवडणूक लागली आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना सोबत घेऊन भाजपचे विवेक कोल्हे यांनी मंत्री विखे पाटलांच्या पॅनलचा धुव्वा उडवत गणेश कारखाना ताब्यात घेतला आणि त्याच वेळी विवेक कोल्हे यांचं नाव राज्यभर चर्चेत आलं.
विवेक बिपिन कोल्हे हे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता बिपिन कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. ते अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक असून विविध ८ ते १० सहकारी संस्थांवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.३६ वर्षीय विवेक कोल्हे यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले असून त्यांनी नाशिक येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून बीई सिव्हिल पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर २०१७ साली संजीवनी सहकारी साखर कारखान्यात संचालक म्हणून त्यांची निवड झाली.
विवेक कोल्हे यांनी आपले आजोबा स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवत तरुणांची संघटन बांधणी करत ‘संजीवनी युवा प्रतिष्ठान’ची ९ वर्षांपूर्वी स्थापना केली. अनेक सहकारी संस्थांमध्ये ते आपली कर्तव्ये पार पाडत असून संस्थात्मक राजकारणात मोठ्या प्रमाणात यश मिळवताना दिसत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकांत नेतृत्व सिद्ध
२०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव मतदारसंघात ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये त्यांनी आपले पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या गटाचा धुव्वा उडवत ३१ पैकी २२ ग्रामपंचायती ताब्यात घेत आपले नेतृत्वगुण सिद्ध केले.गणेश कारखान्याच्या निवडणुकीत १५ दिवसांत विखे पाटलांच्या गडात येऊन त्यांच्या पॅनेलचा पराभव केल्याने विवेक कोल्हे चर्चेत आले.
ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहताना देशातील सहकारी तत्त्वावर चालणारा पहिला सीबीजी सीएनजी प्रकल्प कार्यरत केला याचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अमित शहा यांनी विवेक कोल्हे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. तसेच याच कार्यक्रमात उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी आपले संघटन कौशल्य दाखवत नगरपरिषदेची सत्ता ताब्यात घेतली.
तत्पूर्वी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले आशुतोष काळे यांच्यासमोर विवेक कोल्हे उभे राहणार अशी चर्चा असतानाच भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशांचे पालन करत त्यांनी त्या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला आणि मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळे यांना पाठिंबा दिला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी विवेक कोल्हेंना पक्षाने विधान परिषदेचा शब्द दिला होता अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डीत दिली. त्यामुळे विवेक कोल्हे यांच्या नावावर वरिष्ठांकडून शिक्का मुहूर्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
एकूणच फार कमी काळात विवेक कोल्हेंनी आपले नेतृत्व गुण, संघटन कौशल्य, सिद्ध केले. अभ्यासू नेतृत्व आणि चतुर राजकारणी अशी ओळख निर्माण झाल्यामुळे पक्षाने देखील त्याची दखल घेतल्याचे जाणवत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात आहे. विधान परिषदेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून आता भाजपच्या यादीत विवेक कोल्हे यांचे नाव येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा