बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख या दोघांमध्ये थेट लढत होतेय. खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. मात्र मागच्या वेळी केवळ 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी यावेळी आपला अर्ज कायम ठेवल्याने या निवडणुकीसाठी मतदान होतंय. मस्साजोग येथे नेहमीच शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असल्याचं सांगण्यात येतं. आजही मतदान प्रक्रिया शांततेतच पार पडेल असं वाटत होतं मात्र मतदान केंद्राबाहेर दोन गट आमनेसामने आल्याने काही वेळ गोंधळ पाहायला मिळाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.