• Fri. Sep 4th, 2026

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्या मराठीचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

विद्यानंद बापट यांच्याकडून बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे. बापट यांनी शुद्ध मराठी भाषेत आपले विचार मांडताना सर्वसमावेशक विचार मांडावेत, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यात डीजेवर बंदी आणावी अशी मागणी करणारे विद्यानंद बापट हे सध्या प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. विद्यानंद बापट यांची मुद्दा मांडण्याची पद्धत आणि त्यांची शुद्ध मराठी भाषा यामुळे अनेकजण त्यांचे चाहते झाले आहेत. विद्यानंद बापट यांच्यावर नुकतंच एका इसमाकडून हल्ला झाला. बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावरील मारहाणीच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी विद्यानंद बापट यांच्या मराठीचं देखील कौतुक केलं आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“सध्या बापटांची मराठी ट्रेंडींग आहे. खरोखर मराठीच्या शुद्धतेचा नमुना त्यांच्या बोलण्यातून पाहायला मिळतो. आता अपेक्षा एवढीच करु की, जशी ते अतिशय सुंदर आणि स्वच्छ मराठी वापरतात ते पाहून आपल्याला आनंद होतो. विचार मांडताना इतरांना आपल्या विचारांचा त्रास होणार नाही, आपण जसे शुद्ध मराठीत भूमिका मांडतात तसे ते अधिक सर्वसमावेशक अशा पद्धतीने ते विचार मांडतील. शुद्ध मराठीसाठी मला ट्युशनच घ्यावी लागेल. केवळ बापटच नाही तर कुणीही भाषा बोलतात तेव्हा ती भाषा ऐकून आनंद वाटतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

“मी कालच विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध केलेला आहे. वेगवेगळे विचार असू शकतात. काही लोकं या बाजूचे तर काही लोकं त्या बाजूचे असू शकतात. पण हिंसा ही काही योग्य नाही. प्रत्येकाने आपापला मुद्दा मांडला पाहिजे. एखादा सण आणि उत्सव आपण ज्यावेळेस साजरा करतो, तो जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीने आपल्याला साजरा करता आला तर त्याचे महत्त्व अधिक असते. पण त्याचवेळी वर्षानुवर्षे काही पद्धती त्या ठिकाणी पडतात. त्या पद्धती बंद करत असताना केवळ कायद्याच्या बडग्याने त्या बंद न करता, त्याचसोबत लोकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढणं जास्त आवश्यक असतं”, असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं.

‘डीजेमुळे भूकंपासारखा आवाज येतो’

“मी आजच पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की, मार्ग कसा काढायचा याबाबत बऱ्याच गोष्टींवर सर्वांचं एकमत झालं आहे. ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो, डीजेमुळे भूकंप आल्यासारखा आवाज असतो. अशा गोष्टी होऊ नये याबाबत सगळ्यांचे एकमत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की, यावेळेस पुण्यातही गणेशोत्सव आणि सर्व उत्सव पारंपरिक आणि चांगल्या पद्धतीने साजरी होताना दिसतील. विशेषत: लोकांच्या सहभागानेच डीजे संस्कृती कमी होताना दिसेल”, असं मुख्यंत्र्यांनी सांगितलं.

डीजे बंदीच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

“डीजे बंदीची पॉलिसी एकदम तयार होणार नाही. आता आम्ही सर्वांना सांगितलं आहे की, चर्चेतून प्रश्न सोडवा. आमचा अनुभव असा आहे की, ज्या ठिकाणी चर्चा केली तिथे 90 ते 95 टक्के लोकं तयार होती. त्यामुळे चर्चेतून हे घडवायचं, मग त्यानंतर त्याठिकाणी तसा आदेश काढायचा, अशा पद्धतीने काम सुरु आहे. थोडा वेळ देखील आपण दिला पाहिजे. पण दिशा पक्की आहे. आपल्याला खूप प्रचंड ध्वनी प्रदूषणापासून दूर जावं लागेल. पोलीस आयुक्त आणि मंडळ यांच्याशी चर्चा करुन डीजेबाबत योग्य निर्णय होईल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.