• Sat. Jun 6th, 2026
    Marathi Compulsion : मराठीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत, पण नियम तोडणाऱ्यांवर 1 मे पासूनच कारवाई ; मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

    Pratap Sarnaik: राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली असून १ मे पासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

    मराठीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत, पण नियम तोडणाऱ्यांवर 1 मे पासूनच कारवाई ; मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा शिकावीच लागेल,” अशा शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी अप्रत्यक्षपणे मुदत देत असल्याची घोषणा केली आहे. १ मे पासून राबविण्यात येणाऱ्या मराठी सक्तीच्या मोहिमेबाबत आणि रिक्षा चालकांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची भूमिका आज स्पष्ट केली आहे.

    मराठीसाठी आरटीओ कार्यालयातच वर्ग

    अमराठी चालकांनी मराठी शिकण्याची तयारी दर्शवली असून त्यासाठी सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. याबद्दल माहिती देताना सरनाईक म्हणाले, “ज्या चालकांना मराठी शिकण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्यांना शिकवण्यासाठी पुस्तिका दिल्या जातील. ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ आणि ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ या संस्थांच्या माध्यमातून आमचे आरटीओ अधिकारी त्यांना मराठीचे धडे देतील.”

    १ मे ते १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

    राज्यातील ३९ आरटीओ कार्यालयांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. सरनाईक यांनी सांगितले की, “१ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत ही विशेष मोहीम चालेल. या मोहिमेचे नेतृत्व संबंधित अधिकारी करतील. दर आठवड्याला या मोहिमेचा अहवाल सादर केला जाईल आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”

    Maharashtra TimesNashik TCS Case: नाशिक धर्मांतर प्रकरणात थेट ‘मलेशिया’ कनेक्शन; कोर्टातील नव्या माहितीने खळबळ, काय प्लॅन होता?

    मराठी न आल्यास परवाना रद्द होणार?

    मराठी भाषा बोलता आली नाही तर परवाना ( लायसन्स) रद्द होणार का, या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना सरनाईक म्हणाले, “केवळ मराठी भाषा येत नाही म्हणून कोणाचेही लायसन्स रद्द केले जाणार नाही. परंतु, जर कोणी बेकायदेशीररीत्या वाहतूक करत असेल, आरटीओच्या नियमांचे उल्लंघन करत असेल किंवा चुकीची कागदपत्रे सादर केली असतील, तर मात्र परिवहन विभागाला त्यांचे लायसन्स रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि विभाग ती कारवाई नक्कीच करेल.”

    “कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही”

    काही संघटनांनी नियमांकडे डोळेझाक करण्याची विनंती केली होती, ती मंत्र्यांनी फेटाळून लावली. “काही नेत्यांनी आम्हाला त्रुटींकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले, पण ते शक्य नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. आरटीओ नियमांनुसार २० कलमे आहेत, त्या कलमांच्या आधारे चुकीचे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

    दंडात्मक कारवाई

    या मोहिमेदरम्यान आरटीओ अधिकारी नलावडे यांना धमक्या आल्याचेही मंत्र्यांनी नमूद केले. ते म्हणाले, “मोठमोठ्या भाई लोकांच्या धमक्या येऊनही आमच्या अधिकाऱ्यांनी डगमगता आपले कर्तव्य पार पाडले. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार ५६५ रिक्षाचालकांचे जवाब घेतले असून, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांकडून ८७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.”

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा